पुणे : पॉलिसी रिन्यू करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. एका ६२ वर्षीय ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. चेतन त्र्यंबक पालेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पालेकर यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. पूजा कदम बोलत असून पॉलिसी खंडित झाल्याचे सांगितले. पॉलिसी पुन्हा सुरु करण्यासाठी काही रक्कम भरावी लागेल असे सांगितले.
पालेकर यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे भरले. त्यांनतर बनावट कागदपत्रे पाठवून आणखी पैसे भरण्याचा तगादा लावला. २५ जुलै २०२० पासून ते डिसेंबर २०२२ पर्यंत पालेकर यांच्याकडून एकूण ८८ लाख ९४ हजार ७९३ रुपये उकळले. काही कालावधीनंतर पालेकर यांना संशय आल्याने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. याप्रकरणी पूजा कदम, अंकिता, देशमुख, नरेंदर, रामचंद्र रेड्डी, मयंक अगरवाल आणि अश्विन यांच्यावर भारतीय दंड विधान ४१९, ४२० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील या करत आहेत.