पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाचे ॲप डाऊनलोड केल्यानंतरही अडचणी दूर न झाल्याने एका महिलेने बँकेच्या कस्टमर केअरचा नंबर गुगलवरून शोधला. मात्र, हा नंबर सायबर चोरट्यांचा निघाला. त्याने फोन होल्डवर ठेवायला सांगून तब्बल २ लाख २२ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी या गृहिणी असून त्यांचे पती दुबईला असतात. ते पत्नीच्या स्टेट बँकेतील खात्यावर पैसे पाठवत असतात. जुलै २०२१ मध्ये त्यांना बँक खात्यासंदर्भात अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. तेव्हा त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यांना बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना एसबीआय ॲप डाऊनलोड करायचा सल्ला दिला. त्यानंतरही अडचणी दूर न झाल्याने त्यांनी ३१ जुलै रोजी गुगलवरून एसबीआय कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर फोन केला. त्यावरील पुरुषाने त्यांना ॲनिडेक्स व टेक्स्ट मेसेजचा ॲप असे दोन वेगवेगळे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी दोन्ही ॲप डाऊनलोड केले. त्यावर त्यांनी आपले बँक खात्याची माहिती भरली. तेव्हा कस्टमर केअरवरील पुरुष त्यांना वारंवार एरर येत असल्याचे सांगत होता. त्याने फिर्यादीला मोबाईल होल्ड करून ठेवण्यास सांगितले.
अर्धा तास फोन होल्डवर असल्याने त्यांना संशय आला. त्यांनी मुलीला एसटीएम कार्ड देऊन मिनी स्टेटमेंट काढण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या खात्यातून पेटीएम, ॲमेझाॅन, क्विक सिल्व्हर अशा वेगवेगळ्या ऑनलाइन ट्रान्झक्शनमधून पैसे काढल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी फोन कट करून दोन्ही ॲप डिलीट केले. तसेच त्यांच्या खात्यातून चित्तरंजन रेल्वे स्टेशन येथील एटीएममधून पैसे काढले गेल्याचे समजले. अर्ध्या तासाच्या आत त्यांच्या खात्यातून २ लाख २२ हजार ९४६ रुपये वेगवेगळ्या ठिकाणांहून काढले गेले. पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करीत आहेत.