पिंपरी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी तयार करण्यात येणार आहे. भीमसृष्टी आणि म्युरल्स बसविण्याच्या या कामात प्रशासनाच्या गलथानपणामुळे त्याच ठेकेदाराला काम देण्याचा घाट घातला आहे. परिणामी दीड कोटीचे हे काम आता तीन कोटींवर गेले आहे.पिंपरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आहे. या पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या पुतळ्याच्या ठिकाणी जीना तयार करण्याचे काम सुरू आहे. डॉ. आंबेडकर पुतळा उद्यान हे पूर्वीच्या खाणीच्या ठिकाणी आहे. त्यामुळे पाया खोदताना खाणीतील भराव मोठ्या प्रमाणात काढावा लागला. त्यामुळे खर्चात वाढ झाली. वास्तुशास्त्रज्ञाकडील नियोजित भीमसृष्टीच्या डिझाईननुसार जीना चढणे व उतरणे याकरिता वेगवेगळी डिझाईन बनविली. अंदाजपत्रकीय रक्कम ४८ लाख ५० हजार रुपये इतकी होती. त्यामध्ये ३६ लाख ५० हजार रुपये सुधारित खर्चाची वाढ करण्यात आली. या भीमसृष्टीसाठी निविदा प्रक्रिया राबविली. निविदा रकमेपेक्षा १२.६० टक्के कमी म्हणजेच १ कोटी ४५ लाख रुपये दर सादर केला. त्या कंपनीचा लघुतम दर असल्याने ११ जानेवारी २०१५ रोजी त्यांची निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानंतर पुन्हा म्युरल्स बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी पुन्हा निविदा मागविल्या. मात्र एकाच ठेकेदाराने निविदा भरली. कामाचा दर २ कोटी ९७ लाख रुपये ठरविला असताना या ठेकेदाराने हे काम तीन कोटी ११ लाख रुपयांवर नेले आहे. (प्रतिनिधी)
भीमसृष्टीसाठी वाढीव खर्चाचा प्रस्ताव
By admin | Published: April 18, 2017 3:00 AM