अविनाश फुंदे ।पुणे: विद्यार्थ्यांना आपल्या विविध कामांसाठी गुणपत्रे आणि इतर कागदपत्रे प्रमाणित करण्याची गरज भासत असते. हे प्रमाणीकरण विद्यापीठ प्रशासनाकडूनच करून घ्यावे लागते; परंतु, सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून या कामासाठी अव्वाच्या सव्वा रक्कम आकारली जात आहे. विद्यापीठात या प्रमाणीकरणासाठी प्रत्येकी ८० रुपये एवढे शुल्क आकारले जात आहे. या निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या प्रमाणीकरण शुल्काची माहिती घेतली असता, त्यांच्याकडून प्रत्येकी १० रुपये एवढेच शुल्क घेतले जाते; मग पुणे विद्यापीठामध्येच एवढे अधिक शुल्क का, असा प्रश्न विद्यार्थी करीत आहेत. या प्रमाणीकरणासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो, अर्ज केल्यानंतर प्रत्येक प्रमाणपत्रासाठी ८० रुपये एवढे शुल्क भरून तो अर्ज जमा करावा लागतो. नंतर सात ते आठ दिवसांनी ते प्रमाणपत्र घेण्यासाठी यावे लागते. तेच मुंबई विद्यापीठामध्ये अर्ज जमा केल्यानंतर, लगेच दुसऱ्या दिवशी देण्यात येतात. सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये या कामासाठी अनेक विद्यार्थी बाहेरगावून येत असल्याने त्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तत्काळ प्रक्रिया व्हावी आणि इतर विद्यापीठाच्या तुलनेतच शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. प्रमाणीकरण हे लगेच होणे शक्य आहे. कारण, मूळ कागदपत्रे पडताळणी तर अर्ज सादर करतानाच होत असते. त्यावर फक्त सही आणि शिक्क्यासाठी आठ दिवसांचा कालावधी का लागतो, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण किंवा नोकरीसाठी कागदपत्रे प्रमाणीकरणाची गरज भासत असते. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हे प्रमाणीकरण करवून घ्यावे लागते. या कामासाठी विद्यापीठाने नाममात्र शुल्क घेणे आणि सहकार्याची भूमिका दाखवणे अपेक्षित असताना इथे मात्र विद्यार्थ्यांची पिळवणूकच केली जाते की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, प्रमाणित केलेली कागदपत्रे ज्या पाकिटामध्ये सीलबंद केली जातात त्या पाकिटासाठीसुद्धा विद्यापीठाकडून प्रत्येकी ८० रुपये शुल्क आकारण्यात येते............मला परदेश शिक्षणासाठी कागदपत्रांचे प्रमाणीकरण करून घ्यायचे होते. त्यासाठी मी मुंबई विद्यापीठात गेले, तर तिथे एकाच दिवसात मला ते प्रमाणित करून मिळाले आणि प्रत्येकी १० रुपये शुल्क घेतले. परंतु, सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये मात्र प्रत्येकी ८० रुपये शुल्क भरावे लागले. मला फक्त प्रमाणीकरणासाठीच अडीच हजार रुपयांचा खर्च आला आहे, तोच मुंबईमध्ये फक्त ३०० रुपये एवढा आला आहे. - सावित्री सागर, विद्यार्थिनी
विद्यापीठातील शिक्षणशुल्क ठरविण्याची जबाबदारी वेगवेगळ्या अधिकार मंडळांकडे आहे. त्यांनी जे शुल्क ठरवून दिले आहे, त्याप्रमाणेच आम्हाला आकारणी करावी लागते. प्रमाणीकरणासाठी पूर्वीपासूनच एवढे शुल्क आकारले जात आहे, त्यामध्ये सध्यातरी काही वाढ झालेली नाही. - अशोक चव्हाण, संचालक , परीक्षा आणि मूल्यांकन मंडळप्रमाणीकरणासाठीचा शिक्का ऐंशी रुपयांना प्रोफेशनल कोर्ससाठी ८० रुपये नॉन प्रोफेशनलसाठी ५५ रुपये एखाद्या विद्यार्थ्याला १० गुणपत्रे प्रमाणित करून घ्यायची असतील तर १० ७ ८० = ८०० रुपये नॉन प्रोफेशनलसाठी ५५ रुपयेम्हणजे १० गुणपत्रांसाठी १० ७ ५५ = ५५० रुपये