दीपक जाधव पुणे : शहराची वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेकडून आयोजिण्यात आलेल्या उपक्रमांवर बाजारभावापेक्षा जास्तीचा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांमधून निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर शाडू मातीच्या मूर्तीच्या गिनीज बुक रेकॉर्ड नोंदविण्याचे पुढे काय झाले अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.पुणे महापालिकेच्या वतीने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी २ कोटींच्या निधीची तरतूद केली होती. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ३ हजार शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविणे, दुचाकी रॅली, शहरात प्रवेश करण्याच्या ठिकाणी स्वागत कमानी उभारणे, फ्लेक्स उभारणे अशा विविध कारणांसाठी हा निधी खर्च करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे शहर संघटक सुभाष जाधव यांनी माहिती अधिकारांतर्गत या खर्चाची माहिती मिळविली.शहरातील ११६ शाळांमधील ३ हजार विद्यार्थी एकाच वेळी एकत्र येऊन शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्यासाठी ९ हजार किलो शाडू मातीची खरेदी करण्यात आली. मनपाच्या भवन रचना विभागाने १५ रुपये प्रतिकिलो दराने शाडू मातीची खरेदी केली. प्रत्यक्षात बाजारात ८ ते ९ रुपये किलो दराने शाडू माती उपलब्ध आहे. गिनीज बुकमध्ये विक्रम नोंदविण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. त्यासाठी भारतीयन्स या संस्थेची सल्लागार म्हणून नियुक्ती करून त्यांना २ लाख रुपये देण्यात आले. मात्र अद्यापही याची गिनीज बुकमध्ये नोंद होऊ शकलेली नाही.शहरात पालिकेच्या वतीने विविध ठिकाणी फ्लेक्स उभारण्यातआले. त्यासाठी २० लाख रुपयांचा निधी ठेवण्यात आला होता.स्टार फ्लेक्स वापरल्याचे नमूद करून त्याचा दर २० रुपये प्रतिस्क्वेअरफूट असा दाखविण्यात आलाआहे. प्रत्यक्षात साधेच फ्लेक्स वापरण्यात आले होते. त्याचा बाजारातील दर ७ ते ८ रुपये प्रतिस्क्वेअर फूट इतका आहे.शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित रॅलीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पावसामुळे लोक रॅलीला आले नाहीत, असे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. रॅलीसाठी तयार करण्यात आलेला अल्पोपाहार गोरगरिबांना वाटून टाकण्यात आल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.पुरी ५, शेंगदाणा चटणी, मोतीचूर लाडू आदी पदार्थ असलेल्या अल्पोपाहाराच्या एका प्लेटचा दर ५१ रुपये इतका लावण्यात आला. या अल्पोहाराचे टेंडर वसुधंरा बचत गट (५६८, नारायण पेठ, टिळक भवन, पुणे ३०) या संस्थेला देण्यात आले.शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाच्या उपक्रमांचा एवढा गोंधळ होता, की कोणता उपक्रम नक्की कोणत्या विभागाकडे आहे, याची व्यवस्थित माहिती मिळत नव्हती. उदा. दुचाकी वाहन रॅलीची माहिती आयुक्त कार्यालयाकडे मागितली असता त्यांनी ते पत्र आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने आमचा याच्याशी संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर समाजविकास विभागाने माहितीसाठी पत्र पाठविण्यात आले. भिंती रंगवायची निविदा प्रक्रिया भवन रचना विभागाने राबविली. प्रत्यक्षात हे काम बांधकाम विभागाकडून करण्यात आले. शाडू मातीचे गणपती बनविण्याचे निविदा प्रक्रिया भवन रचना विभागाने पार पाडली, तर त्याचा उपक्रम शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे माहिती मिळविण्यासाठी खूप वणवण करावी लागल्याचे सुभाष जाधव यांनी सांगितले.>खर्चाची चौकशी व्हावीशतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांसाठी बाजारभावापेक्षा जास्तीचा खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकाºयांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून दिसून येते आहे. या प्रकरणाची महापालिका आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली आहे.- सुभाष जाधव,शहर संघटक, संभाजी ब्रिगेड>टेंडर प्रक्रिया राबवून कार्यवाहीशतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवांच्या उपक्रमांसाठी टेंडर प्रक्रिया राबवून कमीत कमी दर आलेल्या संस्थांना काम देण्यात आले. शाडू मातीच्या एकाच वेळी ३ हजार मूर्ती बनविल्याच्या विक्रमाचा प्रस्ताव पालिकेकडून पाठविण्यात आलेला आहे. अद्याप त्यांचा निर्णय कळविण्यात आलेला नाही.- मुक्ता टिळक, महापौर
उत्सवावर वाजवीपेक्षा अति खर्च, माहिती मिळविण्यासाठी वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:45 AM