पुणे : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून १०० ते ११५ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. या गाड्या दि. ३१ ऑगस्टपासून सोडण्यात येणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.पुणे व पिंपरी चिंचवडमधून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे एसटीकडून दरवर्षी जादा बस सोडण्यात येतात. यंदाही चिपळूण, खेड, गुहागर, देवरुख, रत्नागिरी, दापोली, महाड याठिकाणी जाण्यासाठी जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. एकुण १०० ते ११५ जादा बस सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. या बस प्रामुख्याने स्वारगेट, पुणे स्टेशन व पिंपरी चिंचवड या स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. एकुण जादा बसपैकी निम्म्या बसला आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. मागील दोन महिन्यांपासूनच ही सुविधा सुरू आहे. तसेच ऐनवेळी होणारे आरक्षण आणि प्रवाशांची गर्दी पाहून बस सोडण्याचे नियोजन आहे. गणेशोत्सवाला सुरूवात होण्याच्या दोन दिवस आधी म्हणजे दि. ३१ ऑगस्टपासून जादा बस सोडण्यात येणार आहे. दि. ३१ऑगस्ट व दि.१ सप्टेंबर यादिवशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सर्व जादा बस मार्गावर असतील. तसेच दि. ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत या बस मार्गावर धावणार आहेत. दि. ३ ते ६ या दरम्यान प्रवाशांच्या मागणीनुसार जादा बस सोडण्यात येतील. दरम्यान, वरंध घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खेडमार्गे कोकणात जाणाऱ्या गाड्या अन्य मार्गाने धावणार आहेत. स्वारगेट स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या महाबळेश्वर, पोलादपुरमार्गे तर पिंपरी चिंचवड स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या ताम्हिणी घाटमार्गे सोडण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.----------
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीच्या जादा बसेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 6:37 PM
पुणे व पिंपरी चिंचवडमधून गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते...
ठळक मुद्दे३१ऑगस्ट व १ सप्टेंबर यादिवशी गर्दी होण्याची शक्यता असल्याने सर्व जादा बस मार्गावर ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत या बस मार्गावर धावणार