भोर तालुक्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आज भोर-महाड रस्त्यावरील शिरगाव येथे १२३ मिलिमीटर, तर हिर्डोशी येथे १०० मिलिमीटर, तर नीरा देवघर धरण भागात ५९ मिलिमीटर पाऊस झाला असून एकूण २२०१ मिलिमीटर पाऊस झाला आहे, धरणाच्या पावर हाऊस आणि मोऱ्यांमधून सुमारे ५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.
भाटघर धरण भागात २६ मिमी तर एकूण ६४७ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणाच्या पावर हाऊस आणी मोऱ्यातून सुमारे ८६२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही धरणांतून १३६२४ क्युसेकने पाणी सुरू असल्यामुळे नीरा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर-महाड रस्त्यावर दरडी पडण्याची भीती असून रस्ता धोकादायक झाला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने भोर-महाड रस्त्यावरून प्रवास करू नये, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्या आहेत. दरम्यान, मुसळधार पावसाने भोर तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालेले असून वीज नसल्यामुळे रात्री-अपरात्री घराबाहेर पडता येत नाही. संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.