बारामती : बारामती शहरातील बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करीत पुण्यातील एक महिला बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निवासस्थानासमोर पोहोचली. या ठीकाणी संबंधित महिला आत्मदहन करणार होती. मात्र,याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस तत्काळ या ठीकाणी पोहचले. पोलीसांनी त्या महिलेला आत्मदहनापासून रोखत ताब्यात घेतले. या ठीकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या महिलेने बारामतीतीत बड्या उद्योजक तसेच नगरपरीषदेचा माजी पदाधिकाऱ्याच्या विरोधात १३ वर्ष शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा माजी पदाधिकारी उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी आहे. महिलेने केलेल्या आरोपासंबंधित प्रकरण हे बिबवेवाडी पोलीसात दाखल आहे. मात्र, पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप करीत या महिलेने सोमवारी(दि १५) सकाळी १० च्या सुमारास हे टोकाचे पाऊस उचलण्याचा प्रयत्न केला. पोलीस वेळेवर पोहचल्याने अनर्थ टळला.
या महिलेचे पोलीसांनी समुपदेशन करीत मतपरीवर्तन करण्यात आले आहे. यापुढे अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलणार नसल्याचे महिलेने लेखी दिले आहे. महिलेसंबंधित प्रकरण बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या महिलेला पोलीस पुण्यात नेऊन सोडणार आहेत, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.