पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे): माउंट उटी कांगरी हे भारतातील लडाख येथील गिर्यारोहणासाठी आव्हानात्मक ठिकाण. या ठिकाणी शिखर ६ हजार ७० मीटर (१९,९१५ फूट) उंच आहे. त्यामुळे या उंचीवर जाण्याचे धाडस सहसा कुणी करत नाही. मात्र धनकवडीतील गिर्यारोहक तुषार दिघे यांनी उटी कांगरी येथे चढण्याच धाडस केलं, अत्यंत खडतर प्रवास, पुर्वानुभव, शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असलेल्या तुषार ने हे आव्हान पेलले आणि कठीण श्रेणीत गणला जाणारा माउंट उटी कांगरी शिखर सर करण्याचा पराक्रम करून दाखवला. तब्बल ६ हजार ७० मीटर उंच शिखरावर तिरंगा फडकला,
कांगरी शिखर, लेह येथील रुम्त्से गावाच्या वरच्या भागात आहे, हे एक प्रमुख बर्फाच्छादित शिखर आहे. हे शिखर लडाख माउंटन गाईड्स असोसिएशनच्या स्थानिक गिर्यारोहकांनी २०१९ मध्ये शोधले. या ठिकाणी चढाई करताना गिर्यारोहकांचा चांगलाच कस लागतो, कारण ७० अंशाच्या कोनात हे शिखर आहे. अंगावर येणारी चढाई चढताना आईस एक्स आणि क्रंपोन अशा उपकरणाचा येथे चढाई करताना आधार घ्यावा लागतो.
तुषार दिघे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, उटी कांगरी ही एक ऑफबीट म्हणजे आडवाटेची चढाई आहे. लेह पासून ९० किलोमीटर अंतरावर आहे.अत्यंत कमी गिर्यारोहक ही चढाई करतात. लडाखच्या दुर्गम भूप्रदेशातील या वेगळ्या शिखरावर चढाई करण्यासाठी सध्याचा हंगाम योग्य आहे. हिवाळ्यात या ठिकाणी बर्फ पडत असताना सहा हजार मिटर पर्यंत चढणे कठीण असते. आशा मोहिमा आखण्यासाठी अनुभवाची गरज असते तसेच हे शिखर सर करण्यासाठी उच्च उंचीच्या ट्रेकिंगचा पूर्व अनुभव आवश्यक आहे. शिखराच्या शेवटचा टप्पा हा मोहिमेतील सर्वात मोठा थकवणारा आणि धोकादायक टप्पा आहे.
तुषारने ही मोहीम एका दिवसात म्हणजे सुमारे १२ ते १३ तास सलग चढाई करून पूर्ण केली . त्यामध्ये तुषार ने अल्फाइन पद्धतीने ही मोहीम सर केली त्यासाठी उच्च शारीरिक क्षमता असावी लागते. तुषार दिघे व त्यासोबत त्याचे सहकारी खितिज विचारे व सुबोध गांगुद्रे होते.या यशाबद्दल एस. एल. ऍडव्हेंचरचे एव्हरेस्ट वीर लहू उघडे यांनी या यशाबद्दल तुषार दिघे याचे अभिनंदन केले.
तुषार चे मूळ गाव भोर तालुक्यातील शिवापूर असून पुण्यातील धनकवडी बालाजीनगर मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांनी गिर्यारोहणातील प्रशिक्षण २०२१ साली बेसिक माउंटेनियरिंग कोर्स सिक्कीम येथील भारतीय सैन्य दलाच्या संस्थान मध्ये पूर्ण केला आहे. तसेच एडवांस कोर्स हा दार्जेलिंग येथें इंडियन हिमालयन मध्ये पूर्ण केला. या आधी फ्रेंडशिप शिखर, काब्रु डोम २ शिखर, तसेच कोर्स दरम्यान न्यू व्हर्जिन शिखर सिक्कीम अशा हिमालयातील शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच सुळका बान सर केला आहे. अनेक गडकिल्ले, सुळके या आधी सर केली आहेत.