इंदापूर तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, खोरोची, बोराटवाडी तर माळशिरस तालुक्यातील बांगार्डे, पळसमंडळ या परिसरातील बहुतांश शेतकरी वर्ग हा निरा नदीच्या पाणी स्रोतावरती अवलंबून आहे. गेल्या वर्षी मुबलक प्रमाणात झालेल्या पावसामुळे या वर्षी नदी पात्रातील जलसाठा तुलनेत जास्त दिवस टिकला असला, तरी सध्या या परिसरातील नदीमधील जलसाठा पूर्णपणे कमी झाल्याने, शेतातील ऊस पिकासह फळबागा, तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गंभीर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
अगोदरच विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जात आहे, तर दुसरीकडे नदी पात्रातील जलसाठाही दिवसेंदिवस कमी होत संपुष्टात आला असल्याने, शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे निरा नदी पात्रात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
सध्या निरा नदी पात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याने, पुढील काही दिवसांत नदीमधील पाणी पूर्णपणे संपेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे पुढील काळात शेतीबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे. त्यामुळे सध्या नदीमध्ये पाणी सोडण्यात यावे.
भगवानराव रणसिंग
शेतकरी
निमसाखर-बांगार्डे परिसरातील निरा नदी पात्रातील संपुष्टात आलेला जलसाठा.