सुपे : बारामती तालुक्यातील सुपे परिसरात प्रथमच रानगव्याचे दर्शन झाले. येथील डाकबंगला ( जुन्या शासकिय विश्रामगृह ) परिसरात चार रानगवे ग्रामस्थांना फिरताना दिसले. ग्रामस्थांनी पाहण्यासाठी गर्दी करताच गवे घाबरुन दुसऱ्या बाजुला जात होते. येथील डाकबंगला परिसरात अनेकांनी जमिनी खरेदी करुन प्लॉट तयार केले आहेत. त्याला तारेचे कंपाउंड तयार केले आहे. त्यातुन मार्ग काढत रानगवे काळखैरेवाडी हद्दीतून कुतवळवाडी हद्दीकडे निघुन गेले. पश्चिम घाटामध्ये रानगव्यांची संख्या जास्त आहे. मात्र म्हशी सारखा दिसणारा रानगवा प्राणी बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सुपे भागात दिसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती. गवा हा लाजाळु प्राणी असल्याने मानसांची गर्दी होताच ते निघुन गेले. बारामती तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, रानगवा हा प्राणी अत्यंत लाजाळू असतो तो कोणावरही हल्ला करत नाही. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. या परिसरातील नागरिकांनी त्यांना त्रास देऊ नये अथवा इजा करू नये. आपोआप मनुष्य वस्तीतून ते निघून जातील.
अत्यंत लाजाळू प्राणी रानगवा फिरतोय शहरात; बारामतीच्या सुपे परिसरात गव्यांचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:38 AM