पुणे : मांजरी येथील सिरम इन्स्टिटयूट कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. मात्र गुरुवारी दुपारी सिरम मधील एका इमारतीला भीषण आग लागली. अग्निशामक दलाला काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग विझविण्यात यश आले होते. मात्र तोपर्यंत या आगीत पाच कामगारांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याचदिवशी तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिटयूटला भेट देत परिस्थिती जाणून घेतली होती. शनिवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सिरमला भेट दिली. यावेळी त्यांनी सिरम मधील आगीची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. वारजे येथील कार्यक्रम संपल्यानंतर ते सिरममध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी आग लागलेल्या ठिकाणची पाहणी करत पाहणी केली. यावेळी सिरम इंस्टीट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी पवार यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, विठ्ठल मणियार, आमदार चेतन तुपे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त कल्याण विधाते आदी उपस्थित होते.
आग नेमकी कुठे लागली, आगीचे कारण काय, आग विझविण्यासाठी तात्काळ कोणत्या उपाययोजना राबविल्या गेल्या, मदत कार्य कसे राबविले गेले, यासंदर्भातील सविस्तर माहिती पवार यांनी घेतली.या आगीच्या घटनेमध्ये मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी काय मदत केली जाणार आहे. याबद्दलही पवार यांनी पूनावाला यांच्याकडे चौकशी केली. यासोबतच भविष्यात योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना देखील पवार यांनी केल्या.
एसी डॅक्टमुळे आग सर्वत्र पसरल्याचा प्राथमिक अंदाजसिरम इन्स्टिट्युटमध्ये निर्माणाधीन असलेल्या इमारतीत एकाच वेळी २ ते ३ कंपन्यांची वेगवेगळी कामे सुरु होती. त्यात ए सी डक्टचेही काम केले जात होते. त्यातूनच आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या आगीत दोन्ही मजल्यावरील केबीन, पाटिर्शन, वायरी, दरवाजाचे कुशन असे सर्व साहित्य जळून खाक झाले.
याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीचे वृत्त समजताच हडपसर व कोंढवा येथील गाड्या सर्वप्रथम घटनास्थळी पोहचल्या. तोपर्यंत आग सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली होती. या इमारतीतील रुममध्ये पार्टिशन तयार करणे, दरवाजांचा कुशन लावणे, केबीन तयार करणे अशी वेगवेगळ्या २ ते ३ कंपन्यांची कामे सुरु होती. छताचे पीओपी करण्याचे कामही सुरु होते. तसेच ए सी डक्टचे काम सुरु होते. हे ए सी डक्ट सर्व मजल्यावर फिरवले जाते. त्यात नेमकी पहिली आग कोठे लागली. ते अद्याप समोर आले नाही. आग लागल्याने या फर्निचरच्या साहित्याने पटकन पेट घेतला. दरवाजांना कुशन लावले असल्याने त्यांनीही पेट घेतला. धूराला बाहेर जाण्यास जागा नसल्याने आग आतमध्येच धुमसत राहिली. ए सी डक्टमुळे ही आग चौथ्या व पाचव्या मजल्यावर वेगाने पसरली. अग्निशामक दलाच्या हडपसरच्या गाड्यातील जवानांनी इमारतीत अडकलेल्या ६ जणांची सुखरुप सुटका केली.