पुणे : कोणत्या धर्माचे पालन करायचे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु राष्ट्रवादाची अतिरेकी भावना ही भविष्यासाठी घातक आहे. धार्मिक शिकवणीच्या आधारावर कोणताही समाज प्रगती करू शकत नाही. म्हणूनच धर्माची शिकवण दूर सारून, आधुनिक शिक्षण ही काळाची गरज असल्याचे मत ज्येष्ठ अध्यात्मिक गुरू दलाई लामा यांनी व्यक्त केले.एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसºया ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन दलाई लामा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी महापौर मुक्ता टिळक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा.राहुल कराड आदी उपस्थित होते.डॉ. काकोडकर म्हणाले, आपण आज ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये बदल व्हायला हवेत. संशोधनात्मक शिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. टेक्नोसॅव्ही पिढी ज्या वेगाने धावते आहे, त्या वेगाने त्यांना शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी नवे तंत्र अंगीकारले पाहिजे. जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलांची देवाण-घेवाण झाली आणि शिक्षण व औद्योगिक क्षेत्र एकत्रित आले, तर राष्ट्र उभारणीचा वेगही वाढेल. त्यासाठी संशोधनात्मक शिक्षण पद्धतीचे वातावरण तयार केले पाहिजे. आयआयटीच्या थिन फिल्म लॅबोरेटरीचे संस्थापक, समन्वयक आणि सल्लागार कस्तुरीलाल चोप्रा, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर, मुंबईच्या आयआयटीचे माजी सहसंचालक प्रा. एस. सी सहस्त्रबुद्धे आणि कानपूरच्या आयआयटीचे माजी संचालक डॉ. संजय धांडे यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.प्रेम, सहिष्णुता आणि दयाभाव याची शिकवण प्रत्येक धर्माने दिली आहे. धर्माबद्दलच्या चुकीच्या समजुतीमुळे आज द्वेष आणि तिरस्काराची भावना नागरिकांमध्ये रुजली आहे. जगभरातील धार्मिकतेवरून वाद उद्भवत आहेत. अशा वेळी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांनी शिक्षणातून मानवतावाद आणि आपण सर्व मानव एक आहोत, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवायला हवी. पैसा आणि प्रसिद्धी या पलीकडे जाऊन आजच्या शिक्षणपद्धतीने नैतिक मूल्ये, प्रामाणिकपणा, सत्य आणि सद्भाव शिकविला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आपली शिक्षणपद्धती सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करून योगदान दिले पाहिजे. - दलाई लामा
राष्ट्रवादाची अतिरेकी भावना घातक - दलाई लामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:30 AM