मोबाईल किंवा गॅझेटसचा अतिवापर केल्यामुळे डोळयांचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे जवळच्या वस्तू दिसतात, मात्र दूरचे पाहण्यात अडचणी निर्माण होतात, या समस्येला मायोपिया असे म्हटले जाते. काही वेळा अंधुक दिसण्याची समस्या उदभवते. इयत्तेनुसार ऑनलाईन क्लासचा कालावधी ठरलेला असतो. त्यामुळे इतर वेळी मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे या वेळांवर पालकांनी बंधने घालून द्यावीत, असे नेत्ररोगतज्ज्ञांनी सुचवले आहे.
ऑनलाईन शिक्षण सुरु झाल्यापासून लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढल्याच्या तक्रारीही पालकांकडून ऐकायला मिळत आहेत. शाळा सुरु नसल्यामुळे मुलांच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. जंक फूडचे सेवन वाढल्याने मुलांचे वजन वाढले आहे.
--
* जिल्ह्यात पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या - अंदाजे १२ लाख
--------------
* मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने दुष्परिणाम
- स्क्रीन टाईम वाढल्याने डोळयांचा कोरडेपणा, खाज सुटणे, डोळयांच्या कडा लाल होणे, कृत्रिम अश्रू येणे.
- मायोपिया अर्थात अंधूक दिसण्याच्या तक्रारींमध्ये वाढ.
- सतत बसून राहिल्याने, मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाल्याने लठ्ठपणामध्ये वाढ.
- एकाग्रतेचा अभाव.
- मानदुखी, पाठदुखी.
---
मुले सध्या पूर्ण वेळ घरात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रीन टाईमही वाढला आहे. अशा वेळी पालकांनी मुलांशी चर्चा करुन दिवसभराचे वेळापत्रक ठरवून घ्यावे. दिवसातील स्क्रीन टाईम मर्यादित ठेवण्याकडे कल असावा. त्यासाठी मुलांना विविध छंद जोपासण्याची सवय लावा. आहार, व्यायाम यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
- डॉ. अनिकेत महाजन, बालरोगतज्ज्ञ
---
एकीकडे माझे वर्क फ्रॉम होम, तर दुसरीकडे मुलाचे वर्क फ्रॉम स्कूल सुरु आहे. मुले पूर्ण वेळ घरात असल्याने स्वत:चे काम आणि त्यांचा अभ्यास अशी दुहेरी कसरत करावी लागते. स्क्रीन टाईम हीच मोठी समस्या बनली आहे.
- हितेश पुजारी, पालक
--
* काय करायला हवे?
- गॅजेटसच्या वापरावर आणि वेळेवर मर्यादा असाव्यात.
- व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करावे.
- डोळयांची नियमित तपासणी करुन घ्यावी.
- मुलांचे वेळापत्रक तयार करुन द्यावे.