पुणे : सध्या पुणे व राज्याच्या इतर भागांत डोळे येण्याची (कंजंग्टिवाइटिस) मोठी साथ चालू आहे. ही साथ व्हायरल इन्फेक्शनमुळे आहे. त्यामुळे बरेच रुग्ण मेडिकल दुकानांत येऊन डोळ्यात टाकायचे औषध मागत आहेत. मात्र संभाव्य धाेका टाळण्यासाठी नेत्ररोगतज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय काेणतेही औषध देऊ नये, असे आवाहन पुण्यातील नेत्ररोग डॉक्टरांची संघटना असलेल्या पूना ऑफ्थॅल्मोलॉजिकल सोसायटीने मेडिकल व्यावसायिकांना केले आहे.
शहरातील वाढती डोळ्यांची साथ पाहता रुग्ण नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला न घेता परस्पर औषध मेडिकलमधून घेतात. असे स्टेरॉइड्स (डेक्सा, प्रेडनीसलोन, लोटेप्रेडनॅल, फ्लुरोमिथेलोन, आदी) असलेले कोणतेही औषध डोळ्यांच्या डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय देऊ नये. या औषधाचा अनियंत्रित वापर केल्यामुळे काचबिंदू व मोतीबिंदूसारखे गंभीर आजार होतात.
डोळ्याची लाली/सूज या कारणामुळे रुग्ण प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध मागण्यास आला तर त्याला नजीकच्या सरकारी/ निमसरकारी/ खासगी डोळ्यांचे हॉस्पिटल/ दवाखान्यात त्वरित सल्ला घेण्यास सांगा. आपण आपल्या दुकानात स्टाफ / कर्मचारी या सगळ्यांना या सूचना पोहोचवा. आपल्या सहकार्यामुळे चुकीच्या औषधांमुळे होणारी हानी पूर्णतः टाळता येईल, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंदार परांजपे आणि सचिव डॉ. सागर वर्धमाने यांनी केले आहे.