पुणे : गेल्या २२ वर्षांपासून मी ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या शवविच्छेदनगृहात काम करीत आहे. पहिले काही दिवस खूप त्रास झाला, भीतीही वाटायची, मृतदेहांचा वास सहन होत नसल्याने जेवणाची इच्छाही नसायची. हळूहळू आठवडाभराने कामाची सवय झाली आणि त्रास कमी होत गेला. एवढी वर्षे काम केल्यावर आता नजर मेली आहे. मात्र, भावना कशा मारणार, अशा भावना शवविच्छेदनगृहातील ज्येष्ठ कर्मचारी रामदास सोळंके यांनी व्यक्त केल्या.
रामदास म्हणाले, ‘गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यास करावे लागणारे शवविच्छेदन कसोटी पाहणारे असते. आईच्या पोटातील बाळाने अजून जगही पाहिलेले नसते. शवविच्छेदन झाल्यावर बाळ मुलगा आहे की मुलगी, हे तपासावे लागते. जन्माला येण्यापूर्वीच त्याचे आयुष्य संपलेले असते. तेव्हा खूप वाईट वाटते आणि हतबलतेची भावना निर्माण होते. एखाद्या व्यक्तीची क्रूरपणे हत्या होते, त्याच्यावर खूप वार झालेले असतात. अशा मृतदेहांचे शवविच्छेदनही हेलावून टाकणारे असते.’
रामदास यांचे वडील आणि मोठे भाऊही शवागारात कामाला होते. कामाचा अनुभव असलेली व्यक्ती नवीन लोकांना प्रशिक्षण देते. नवीन मुलांना शक्यतो कुजलेले, डिकंपोज झालेले मृतदेह हाताळण्यास दिले जात नाहीत. कारण, अजून त्यांना कामाची सवय झालेली नसते, नजर मेलेली नसते. हळूहळू कामाची सवय झाली की भीती निघून जाते.
रामदास यांनी सांगितले, ‘मी माझ्या दोन्ही मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले. मोठ्या मुलाचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. धाकटा मुलगा पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. मुलांना माझ्यासारखे
कष्ट भोगायला लागू नयेत, अशी माझी मनापासून इच्छा आहे. माझेही पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. १९९०-१९९२ पर्यंत मी नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु नोकरी न मिळाल्याने मी ससून रुग्णालयात रुजू झालो.’
शवागारात माझ्याबरोबर काम करणारा मित्र आणि मी एका कार्यक्रमात एकत्र जेवलो. जेवण झाल्यावर तो घरी गेला आणि मी ड्यूटीवर आलो. घरी गेल्यावर त्याला काही त्रास झाल्याने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. मात्र, त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत. दुर्दैवाने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आल्यावर मीच ड्यूटीवर होतो. असे प्रसंग खूप परीक्षा घेणारे आणि त्रासदायक असतात. कोणीही असले तरी आपण एक कर्मचारी आणि समोर एक मृतदेह एवढीच भावना ठेवून काम करावे लागते.
- रामदास सोळंके