लक्ष्मण मोरे - पुणे : ज्या दिवशी कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तेव्हाच लक्षात आले की आपली लढाई आता सुरु झाली. त्याच दिवशी माझ्या तीन वर्षांच्या मुलाला गावी मामाकडे पाठवून दिले. मी आणि माझे पती आम्ही दोघेही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या सेवेत काम करीत आहोत. महिला उलटून गेला, मुलाची भेट नाही की कोणता सण साजरा केला नाही. मुलाच्या आठवणीने डोळे भरुन येतात; पण कर्तव्य त्यापेक्षा अधिक मोठे वाटते. अशी भावना व्यक्त करताना परिचारिका मीरा सुरेश भवर यांचा गळा दाटून आला होता.मीरा (वय २८) आणि त्यांचे पती सुरेश त्रिंबक भवर (वय ३२) या दाम्पत्याने रुग्णसेवेचा एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. मुळचे बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील भवर दाम्पत्य २०१० पासून पुण्यात राहत आहे. मीरा या पिंपरी-चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात परिचारिका आहेत. तर, सुरेश हे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रोग रुग्णालयात परिचारक आहेत. सध्या हे दोघेही कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या कक्षात नेमणुकीस आहेत. दोघांचाही कोरोनाग्रस्त रुग्णांशी निकटचा संपर्क येतो. रुग्णांचे मनोधैर्य वाढविणे, त्यांना वेळेत औषधे देणे, त्यांना हवे नको पाहणे, रुग्णांवर लक्ष ठेवणे, त्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे काम हे दोघेही या कक्षांमध्ये करतात.सुरेश यांनी लातूरच्या अहमदपूर येथून नर्सिंगचा कोर्स केला. त्यानंतर ते २०१० साली पुण्यात आले. त्यांनी सुरुवातीला खासगी रुग्णालयात काम केले. त्यानंतर त्यांनी २०१४ साली पालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी मिळाली. त्यांच्याच तालुक्यातील चुंबळी या गावच्या मीरा यांच्याशी त्यांचे लग्न झाले. त्यांनीही नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे. त्यांना कर्मधर्मसंयोगाने वायसीएम रुग्णालयात परिचारिकेची नोकरी मिळाली. सुरेश यांचा भाऊ रुबी हॉल रुग्णालयात लॅब असिस्टंट आहे, तर वहिनी सुद्धा परिचारिका आहेत. संपुर्ण भवर कुटुंब रुग्णसेवा करीत आहे. साधारणपणे डिसेंबर-जानेवारीपासूनच डॉ. नायडू रुग्णालयात विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये दुबई, चीनवरुन आलेल्या रुग्णांचा अधिक समावेश होता. ९ मार्च रोजी सिंहगड रस्त्यावरील दाम्पत्य पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनाही आपापल्या रुग्णालयातील कोरोना कक्षामध्ये (आयसीयू) ड्युटी असल्याने त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला काळजावर दगड ठेवत मीरा यांच्या मामाकडे गावी पाठवून दिले. त्यानंतर हे दोघेही पूर्ण समर्पित भावनेने कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत काम करीत आहेत.
कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन असल्याने लोकांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले आहे. आपण आणि आपला परिवार सुरक्षित राहावा याकरिता प्रत्येकजण काळजी घेत आहे. परंतू, स्वत:च्या कुटुंबाचा आणि वैयक्तिक सुखाचा विचार न करता हे कोरोना वॉरियर्स अहोरात्र परिश्रम घेत आहेत. त्या दोघांना एकमेकांना वेळही देत येत नाही की नीट संवादही होत नाही. सामंजस्य, समजूदारपणा आणि एकमेकांच्या कर्तव्याची जाणिव ठेवत हे दाम्पत्य कोरोनाशी लढा देत आहे.
======== आमची सर्व काळजी घेतली जाते... देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, महापौर, महापालिका आयुक्त, अतिरीक्त आयुक्त, आरोग्य प्रमुख, अधीक्षक सर्वजण आमची खूप काळजी घेतात. आम्हाला सर्व सुरक्षा साहित्य पुरविले जाते. सतत आपुलकीने चौकशी करीत असतात. एक कुटुंब असल्याची भावना सर्वांमध्ये आहे. त्यामुळे कामाची आणि कोरोनाशी लढा देण्याची ताकद मिळत असल्याचे मीरा आणि सुरेश भवर यांनी सांगितले.
=====
मुलाच्या आठवणीने गहिवरुन येते... कोरोनाचा पुण्यातील पहिला रुग्ण आढळल्यावर आम्हाला भविष्यातील परिस्थितीचा अंदाज आला होता. त्यामुळे मुलाला गावी पाठविले. त्याला फोन करायचे आम्ही टाळतो आणि व्हिडीओ कॉल तर शक्यतो नाहीच करीत. कारण, व्हिडीओ कॉल केला की त्याला पाहून रडू कोसळते. मग तो सुद्ध मला तिकडे घेऊन जा असे म्हटला की काळजात कालवाकालव होते. गावाकडून आईवडील-सासूसासरे, भाऊ बहिणी, नातेवाईक सतत फोन करुन काळजीने विचारपूस करीत असतात. सर्वजण आमचे मनोधैर्य वाढवितात असेही दोघे म्हणाले.
====== सर्व डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय कर्मचा-यांसह आम्हीही वैयक्तिक सुखाला बाजूला ठेवले आहे. आम्ही कोरोनाला घाबरत नाही. रुग्ण बरे झाले पाहिजेत आणि देश जिंकला पाहिजे हीच आम्हा सर्वांची भावना आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिका, पोलीस, प्रशासन आणि शासनाच्या निदेर्शांचे पालन करावे. सोशल डिस्टन्सिंग राखावे. नागरिकांनी प्रामाणिकपणे शासनाच्या प्रयत्नांना साथ दिली तर कोरोनावर निश्चित विजय प्राप्त करता येईल.- मीरा आणि सुरेश भवर