पुणे : “शिवतीर्थावर (मुंबईतले शिवाजी पार्क) १९७४ मध्ये शिवसृष्टी उभारण्यात आली, तेव्हा मी सहा वर्षांचा होतो. तिथे ‘बाबासाहेब’ या थोर व्यक्तिमत्वाची पहिल्यांदा भेट झाली. तेव्हापासून त्यांचा सहवास लाभला. त्यांच्याकडून इतिहासाविषयी पडलेल्या प्रश्नांची उत्तर जाणून घेतली. ‘शिवचरित्र स्पष्ट करताना इतिहासातल्या चुका पुन्हा करू नका. वर्तमानात भानावर या,’’ असे ते आवर्जून सांगतात. इतिहास कुणाकडून समजावून घ्यायचा असेल तर तो बाबासाहेबांकडूनच. त्यांनी कधी इतिहासाला सोडले नाही आणि त्यांच्या इतिहासात दंतकथांना वाव नाही, या शब्दांत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयीची भावना व्यक्त केली.
शिवसृष्टी येथे आयोजित सत्कार सोहळ्यात ठाकरे बोलत होते. बाबासाहेबांनी गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या कथा, लेख, प्रस्तावना, व्यक्तिचित्रं आणि भाषणांचा समावेश असलेल्या ‘ओंजळ’ या पुस्तकाचे प्रकाशन सह्याद्री प्रकाशनातर्फे या वेळी करण्यात आले. शंभराव्या वर्षी लेखकाचे स्वत:चे पुस्तक प्रकाशित होण्याचा मराठी साहित्य विश्वातला अत्यंत दुर्मिळ योग या निमित्ताने साधला गेला. डॉ. सागर देशपांडे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, “आजही नुसता इतिहास ऐकायला गेले की रुक्ष वाटते. पण बाबासाहेबांकडून इतिहास ऐकताना प्रसंग डोळ्यासमोर जिवंत होतात. बाबासाहेब म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा महापुरुष आहे. त्यांनी लेखनात अलंकारिक भाषा वापरली नसती तर त्या काळात गोष्टी करणं किती कठीण होते हे कळले नसते. तुमच्या डोक्यात ती गोष्ट याच अलंकारिक भाषेद्वारे ते पक्की बसवतात. शिवचरित्र अनेकांनी लिहिले, पण बाबासाहेबांनी ते घराघरात नी मनामनात पोहोचविले.”
आमदार आशिष शेलार म्हणाले, “इतिहासकार, संशोधक, शाहीर, चित्रकार, कीर्तनकार ही सगळी रूपं बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वात आहेत. ते स्वत: सहनशील, दयावान आणि क्षमाशील आहेत. त्यांच्या इतिहास लेखनावर अनेकांनी वार केले; पण त्यांनी संयम आणि क्षमाशीलतेने त्याचा सामना केला.”
चौकट
राज ठाकरेंच्या भाषणाची अशीही सुरुवात
‘जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी राज ठाकरे यांच्या भाषणाची नेहमीची सुरुवात असते. यावेळी त्यांनी भाषण सुरू करताना म्हटले, ‘अर्ध्या चेहऱ्याच्या झाकलेल्या आणि अर्ध्या उघड्या चेहऱ्याच्या बांधवांनो..’ त्यानंतर एकच हशा पिकला.
चौकट
‘त्या’ 75 वर्षांच्या वाटतंच नाहीत
आवाजाबरोबरच व्यक्तिमत्वही ‘चिरतरुण’ असलेल्या आशा भोसले यांचे वय किती? सत्कार सोहळ्यात हा विषय निघालाच. राज ठाकरे यांना कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी कोणीतरी म्हणाले, ‘आशाताई ७५ वर्षांच्या आहेत असे वाटतंच नाही.’ त्यावर ‘हे मला व्यासपीठावरून आवर्जून सांगावेसे वाटले,’ असे म्हणत राज ठाकरे यांनी व्यासपीठावरून हे जाहीरपणे सांगितले. यावर आशाताई चक्क लाजल्या...मग श्रोत्यांमधून कोणीतरी आशाताईंच्या खऱ्या वयाची कुजबूज केली. त्यावर आशाताई मिश्कीलपणे म्हणाल्या, “असं वय सांगायचं नसतं हं.”