राजुरी - शेतमालाला योग्य असा हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आला आहे, असे उद्गार स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आळेफाटा येथे काढले.जुन्नर तालुक्यातील सहकारी दूध संस्थांच्या वतीने तसेच जुन्नर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेट्टी यांचा सत्कार आळेफाटा येथे आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी ते बोलत होते.या प्रसंगी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, दिलीप डुंबरे, निवृत्ती काळे, विघ्नहर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भीमाजी गडगे, जुन्नर तालुका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास कुटे, पश्चिम विभागाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश तात्या बलवणडकर, राजुरी गणेश दूध संस्थेचे अध्यक्ष गोविद औटी, आळे दूध संस्थेचे अध्यक्ष माऊली कुºहाडे, गोमाता दूध संस्थेचे पदाधिकारी ग्राहक पंचायतीचे संघटनमंत्री बाळासाहेब औटी, पंचायत समीतीचे माजी उपसभापती गंगाराम गुजाळ अंबादास हांडे, राम कुºहाडे आदी मान्यवरांसह दूध गवळी उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, भारतात दुधापासून बनवलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात शिल्लक राहत आहेत. कारण, केंद्र सरकारने दुधाची निर्यात बंद केली आहे. ती लवकरात लवकर उठवली, तरच या पदार्थांची परदेशात विक्री होईल व दुधालाही चांगला बाजारभाव मिळेल. पूर्वी खतांना सबसिडी मिळत होती; ती पुन्हा मिळाली पाहिजे व प्रत्येक शेतकऱ्याने संघटित झाले पाहिजे, तर आपणास न्याय मिळेल, असे सांगितले.
योग्य हमीभावाअभावी शेतकरी अडचणीत - राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 11:51 PM