आंबेगाव तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने चांगलाच तडाखा दिला आहे. दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे. रुग्णसंख्या कमी होताच नागरिक पुन्हा नियमांकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. अनेक नागरिकांच्या तोंडावरचे मास्क गायब झाले आहेत. मास्कशिवाय ते इतरत्र फिरत आहेत. कोरोना संपलाच आहे, असे समजून मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने शासनाने अनेक नियम कायम ठेवले आहेत. मात्र विवाह समारंभांना केवळ ५० वऱ्हाडींची परवानगी असताना आता लग्न समारंभ गर्दीत पार पडू लागले आहे. इतकेच काय रात्रीच्या वेळी डीजेबरोबर वरातीसुद्धा होऊ लागले आहेत. डीजेच्या तालावर तरुणाई बेधुंद नाचत कोरोनाला निमंत्रण देत आहेत. विशेष म्हणजे डीजेच्या गाड्या रस्त्यावरून ये जा करताना दिसत असतानाही पोलीस कोणतीही कारवाई करत नाही. दशक्रिया विधी, अंत्यविधी या कार्यक्रमांना होणारी गर्दी कोरोनाला निमंत्रण देणारी आहे. दुसरीकडे प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत आहे. पोलीस प्रशासन कुठलीच दखल घेताना दिसत नाही. मागील काही दिवसात कोणतीच कारवाई झालेली नाही. यामुळे नागरिकांनी नियमांना हरताळ फासला आहे. त्याचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. मागील तीन दिवसांत कोरोना रुग्णसंख्या धोकादायकरित्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावांमध्ये कोरोणाचे रुग्ण सापडल्याने तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. वाढती रुग्ण संख्या चिंताजनक आहे. 30 जूनला तब्बल 36 रुग्ण सापडले, एक जुलैला 66 तर दोन जुलैला 58 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे सध्या ॲक्टिव रुग्णसंख्या 333 वर गेली आहे. तालुक्यात आतापर्यंत 13 हजार 537 नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यापैकी 12 हजार 947 रुग्ण उपचारांत घरी परतले आहेत. 257 जणांचा कोरोणामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने काही प्रमाणात सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र आता शहरांसह छोट्या गावांमध्ये होणारी गर्दी धडकी भरवणारी आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले आहे.
लाट ओसरू लागताच तोंडावरचे मास्क गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:07 AM