पुणे : 'मोर दॅन जस्ट फ्रेंड्स'(एमटीजेएफ) या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांची ॲपविषयीची कल्पना कॉपी केल्याने त्यांनी फेसबुकवर दावा दाखल केला आहे. २०१८ ला हे ॲप सुरु करण्याआधी त्यांनी फेसबुकसोबत बोलणी केली होती, परंतु काहीही उत्तर न देता फेसबुकने त्यांच्या या ॲपची कॉपी करून स्वतः ते फिचर सुरु केले. 'एमटीजेएफ' हे मोबाईल डेटिंग ॲप आहे. या ॲपमध्ये स्वतःच्या मित्रांसोबत आपली ओळख लपवून बोलता येते. या ॲपद्वारे मित्रमैत्रिणींना न घाबरता मनातल्या भावना व्यक्त करू शकतो. समोरच्या मैत्रिणीने अगर मित्राने रिप्लाय दिला तर मात्र तत्काळ त्याची ओळख समोर येते. 'एमटीजेएफ'चे संस्थापक संग्राम काकड यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संग्राम काकड यांनी सांगितल्यानुसार, या ॲपची कल्पना घेऊन ते फेसबुकसोबत बोलणी करत होते, त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. फेसबुकने त्यांच्या या संकल्पनेची कॉपी करून 'सिक्रेट क्रश' नावाने नवीन ॲप सुरु केले. काकड यांनी यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी अर्ज केला आहे. 'एमटीजेएफ'च्या संकल्पनेचा वापर करून फेसबुकने मे २०१८ 'सिक्रेट क्रश' हे फिचर सुरु केले,त्याचे विपणन ही 'एमटीजेएफ'ची कल्पना वापरूनच करण्यात आले, असेही काकड यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी त्यांनी पुण्यातील न्यायालयात फेसबुकविरोधात दावा दाखल केला आहे.