पिंपरी : रशिया- युक्रेन युद्धामुळे ड्रायव्हिंग लायसन्समधील मायक्रोचिप पुरवठ्यास उशीर होत होता. त्यामुळे पक्क्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या छपाईमध्ये अडथळा येत होता. त्यामुळे पक्के लायसन्स, तसेच नूतनीकरण केलेले लायसन्स मिळण्यास उशीर होत होता. मात्र, आता ही अडचण दूर झाली असून, पक्क्या लायसन्सचे आरटीओ कार्यालयाकडून सुरळीत वाटप सुरू आहे.
छपाईसाठी पेंडिंग असलेल्या १० हजार ड्रायव्हिंग लायसन्सपैकी तीन हजार ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रिंटिंग पूर्ण झाले आहे. बाकी सात हजार लायसन्सचेदेखील प्रिंटिंग वेगाने सुरू आहे. सुटीच्या दिवशीदेखील काम करून कर्मचारी प्रिंटिंगचे काम करत आहेत, अशी माहिती आरटीओ कार्यालयाकडून मिळाली आहे.
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन सात महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला. ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्याच्या प्रक्रियेला युद्धाचा फटका बसला. लायसन्समध्ये लागणाऱ्या मायक्रोचिपअभावी शहरातील बरेच वाहन परवाने उपप्रादेशिक विभागाकडून रखडले होते. मात्र, आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, उपप्रादेशिक परिवहन विभागाला उपलब्ध झालेल्या उर्वरित पक्क्या परवान्यांचे वाटप सुरू आहे.
सुटीच्या दिवशीही छपाई
रखडलेले परवान्यांचे सुरळीत वाटप व्हावे, यासाठी सुटीच्या दिवशी कर्मचारी काम करत असून, लायसन्सची छपाई केली जात आहे. छपाईसाठी लागणाऱ्या प्रिंटरची संख्या वाढवली आहे. दिवसाला साधारणपणे दोन हजार कार्ड छपाईची क्षमता असून, सध्या ज्या ब्लँक कार्डवर छपाई केली जाते, ते तीन हजार कार्ड आरटीओ कार्यालयाकडे उपलब्ध आहेत. पुढील दोन- तीन दिवसांत अजून ब्लँक कार्ड उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परवाना छपाईच्या कामाला अधिक वेग येईल.
आरटीओ कार्यालयाकडून वाहनचालकांना मिळणारा पक्का परवाना सुरळीतपणे मिळतो आहे. त्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय ऑनलाइन परवाना उपलब्ध असल्याने वाहनचालकांना परवाना थोडा उशिरा मिळाला तरी काही अडचण येत नाही, असे आमचे निरीक्षण आहे.
-सुनील बर्गे, अध्यक्ष, न्यू पिंपरी-चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल