-नितीश गोवंडे
पुणे : महाराष्ट्रात रेल्वे टर्मिनस म्हटले की मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) डोळ्यासमोर उभे राहते. त्या ठिकाणी रेल्वे उभी राहिल्यानंतर स्थानकाच्या बाहेर पडेपर्यंत आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याने प्रवाशांचे हाल होत नाहीत. मध्य रेल्वेने नुकतेच हडपसर रेल्वे स्थानक टर्मिनस म्हणून घोषित केले; पण या ठिकाणी कोणत्याच पायाभूत सुविधा नाहीत. आधी काम करून नंतर हडपसर टर्मिनस केले असते तर ते प्रवाशांच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरले असते.
सध्या या टर्मिनसवरून फक्त एकच रेल्वे रवाना होते. पुणे रेल्वेस्थानकाचा भार कमी करण्याच्या दृष्टीने हडपसर टर्मिनसची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्षात मात्र नांदेड-हडपसर ही रेल्वे नुकतीच पुणे रेल्वे स्थानकापर्यंत सुरू करण्यात आली. यामुळे सध्या हे टर्मिनस रेल्वे गाड्यांच्याच प्रतीक्षेत आहे.
प्लॅटफार्म अपूर्ण, पार्किंगसाठी नाही जागा
या टर्मिनसच्या प्लॅटफार्म २ व ३ वर पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांचे काम झालेले नाही. प्रवाशांना वेटिंग रूम नाही, (एका पत्र्याच्या खोलीला प्रतीक्षालय केले आहे), कॅन्टीनची सुविधा नाही, प्लॅटफार्म अपूर्ण अवस्थेत आहेत, पार्किंगसाठी जागा नाही, रेल्वे स्थानकासमोरील रस्ता अतिशय अरुंद आहे, ज्येष्ठ नागरिकांना सामानासहित जीना चढून येणे अवघड ठरत आहे, बस किंवा रिक्षाची पुरेशी संख्या नसल्याने त्यांना तासनतास ताटकळत थांबावे लागते. या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया फंडातून ५३९ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप या टर्मिनसवर एकही कॅमेरा नाही. या टर्मिनसपासून पुणे रेल्वे स्थानकाला जाण्यासाठी बस किंवा लोकल सुरू केल्यास प्रवाशांसाठी ते सोयीचे होईल.
टर्मिनस म्हणजे काय?
ज्या रेल्वे स्थानकाहून पुढे रेल्वे जाऊ शकत नाहीत ते म्हणजे रेल्वे टर्मिनस. मुंबईत सीएसटीएम आणि एलटीटी टर्मिनसवर रेल्वे येऊन थांबतात म्हणजे ते शेवटचे रेल्वे स्थानक. या ठिकाणी रेल्वे रिटायरिंग रूम, कॅन्टीन अशा सुविधा असणे गरजेचे आहे.
मार्च २०२४ पर्यंत सोयी-सुविधा होणार पूर्ण
प्रवाशांना लागणाऱ्या मूलभूत सुविधा सध्या आम्ही या रेल्वेस्थानकावर दिल्या आहेत. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा पद्धतीने सध्या काम सुरू आहे. आम्ही आमच्या हद्दीतील रेल्वेस्थानकासमोरील रोडदेखील मोठा करणार आहोत. यासाठी अंदाजे ३५ कोटी रुपये खर्च येणार असून, २१ कोटी रुपये मिळाले आहेत. मार्च २०२४ पर्यंत हडपसर टर्मिनसचे काम पूर्ण होणार असल्याने भविष्यात नक्कीच प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी रेल्वे विभाग आश्वस्त आहे.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे विभाग