सोमेश्वरनगर : साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याचा आदेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. मात्र, ऊसतोडणी मजुरांच्या संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची शक्याता आहे. यंदा उसाचे क्षेत्र वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, संपूर्ण उसाचे गाळप करताना कारखान्यांची दमछाक होणार आहे.
राज्यातील साखर कारखाने २० आॅक्टोबरला सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे साखर कारखानदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निर्णयामुळे कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडणार असून गाळप हंगाम मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे आणि उसाला चांगला दर मिळत असल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्यातच ऊसतोडणी कामगारांनीही संप पुकारला आहे. परिणामी, जादा ऊस असणाऱ्या कारखान्यांना गाळप वेळेत उरकणे अवघड होणार आहे. संपामुळे प्रत्यक्षात कारखाने सुरू होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. त्यातच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी सुरू होत आहे. त्याअगोदर ऊसतोडणी कामगारांचा संप मिटणे आवश्यक आहे; अन्यथा दिवाळीनंतर जर हे कामगार कारखानास्थळावर दाखल झाले, तर हंगाम अजून लांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे-पाटील यांनी २७ आॅगस्ट रोजी ऊसतोडणी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन साखर संघाला दिले आहे. निवेदनात ऊसतोडणी मजुरीत दुप्पट वाढ व्हावी, मुकादम कमिशनमध्ये दुप्पट वाढ व्हावी, राज्य सरकारने २०१४-१५मध्ये २० टक्क्यांची वाढ करून द्यावी, ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रमशाळेची सोय करावी, ऊसतोडणी कामगार व मुकादम यांना शासनाच्या कामगार विभागाची ओळखपत्रे देण्यात यावीत, ऊसतोडणीवर कामगारांना बसत आलेला टॅक्स कपात करू नये, ऊसतोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी आदी मागण्यांसह १५ मागण्यांचा समावेश आहे. मागण्या मान्य करण्यासाठी कामगार संघटना अडून बसली आहे.हंगाम संपण्यासाठीमोठा कालावधीऊस हंगाम उशिरा सुरू करण्याच्या निर्णयामुळे गाळप हंगाम संपण्यासाठी मोठा कालावधी जाणार आहे. अनेक साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात १२ लाख टनांपर्यंत उसाची उपलब्धता आहे. अनेक कारखान्यांनी सक्षम ऊसतोडणी यंत्रणा उभी केली आहे. या वर्षी हार्वेस्टरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला आहे. मात्र, संप लवकर मिटला नाही, तर कारखाने नियमित सुरू होण्यासाठी ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.उसाचे वाढते क्षेत्र पाहता, मंत्री समितीने कारखाने सुरू करण्यासाठी १ आॅक्टोबरला परवानगी देणे गरजेचे होते. तसेच हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानेही ऊस लवकर जाणे गरजेचे आहे. ऊसतोडणी कामगार संप लवकर मिटणे, हेही कारखाने वेळेवर सुरू होण्यासाठी आवश्यक आहे.- अशोक पवार,अध्यक्ष, घोडगंगा कारखानाअनेक वर्षांपासून ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, कारखानदार व शासन कोणताही तोडगा काढत नाहीत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा संप सुरू राहणार आहे.- गहिनीनाथ थोरे-पाटीलअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी कामगार संघटना