पुणे: काँग्रेसच्या प्रदेश शाखेने पुणे शहर लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती केली आहे. मात्र पुण्यातील पक्षात असलेले गटबाजीचे आव्हान त्यांना पेलवणार का? पक्षात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या ज्येष्ठांना राजकारणात नुकत्याच आलेल्या त्या समजावून सांगू शकतील का? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
प्रदेशने आंदोलनाचा एक कार्यक्रम दिला तरी शहरात त्यावर तीन ते चार आंदोलने होत आहेत. त्यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचीही विभागणी झाली आहे. तटस्थ असणारे सर्वच आंदोलनाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाते. एकाकडे गेले तर दुसरा नाराज, नाही गेले तर पहिला नाराज अशी कुचंबणा सध्या सुरू असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. कुठेच जायचे नाही ठरवले तर कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून असलेली सामाजिक ओळखच धोक्यात येते, त्यामुळे कोणाला तरी जवळ करावेच लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.
शहराध्यक्षपदाचा प्रभारी शब्द निघत नसल्याने व त्यावर निवडीचे शिक्कामोर्तब होत नसल्याने शिंदे समर्थक अस्वस्थ आहेत, प्रदेशने सांगितलेले कार्यक्रम प्रभावीपणे राबवले जात नसल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाचे दोन वेळचे उमेदवार राहिलेले प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी त्रस्त आहेत, तर या दोघांच्या वादात काही महत्त्वच मिळत नसलेले प्रदेशवर नियुक्ती झालेले अन्य स्थानिक नेते संतापलेले अशा स्थितीत सध्या काँग्रेसची शहर शाखा आहे. त्यातच त्यांच्याकडून महागाई, बेरोजगारी, इंधनवाढ अशा एकाच विषयावर वेगवेगळी आंदोलने होत असल्यानेही कार्यकर्ते संभ्रमित आहेत.
स्वातंत्र्यानंतर सलग दोन-दोन, तीन-तीन वेळा काँग्रेसने या मतदारसंघात विजय मिळवला. मात्र मागील काही वर्षात भारतीय जनता पक्षाने मतदारसंघ काबीज केला. सलग तीन वेळा त्यांनीही विजय मिळवला. या १५ वर्षांमध्ये काँग्रेस क्रमाक्रमाने क्षीण होत गेली. विसर्जित महापालिकेत पक्षाचे अवघे १० नगरसेवक होते. ६ विधानसभा मतदारसंघांपैकी एकातही विजय मिळाला नव्हता. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला अनेक वर्षांनी विजय पाहायला मिळाला, तरी संघटना म्हणून पक्षाचे शहरातील वर्चस्व कमीच झाले आहे.
१४ ऑगस्टला या विषयावर बोलेन
या विषयावर आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबर संपर्क साधला असता त्यांनी, आपण सध्या परगावी आहोत, १४ ऑगस्टला या विषयावर बोलेन, असे सांगितले.