पुणे: मोठ्या काँग्रेसप्रमाणेच युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला. विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले. प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राऊत यांची प्रदेशाध्यक्षपदाची मुदत लवरच संपुष्टात येत आहे. त्यांची संमती नसताना केंद्रीय युवक काँग्रेसने राज्यासाठी कार्याध्यक्ष या पदाची निर्मिती करून त्यावर नियुक्तीही केली. राऊत यांना ही नियुक्ती मान्य नव्हती. तेव्हापासूनच मतभेदांची सुरूवात झाली. त्याचा परिणाम युवक काँग्रेसने जाहीर केलेल्या विधानसभेला घेराव या कार्यक्रमावर झाला. लाल महाल (पुणे) ते विधानसभा अशी ५ दिवसांची पदयात्रा करून हा घेराव घालण्यात येणार होता. मात्र पुण्यातच ही यात्रा अडवण्यात आली. त्यानंतर पुढे या यात्रेचा सगळा उत्साहच संपला. विधानसभेचा घेरावही कसाबसा पार पडला. यात्रेतून मधूनच अनेक कार्यकर्ते गायब झाले. काँग्रेसच्या बड्या नेत्यांनाही या यात्रेकडे फारसे लक्ष दिले नाही.
त्यानंतर कुणाल राऊत यांनी अचानक गुरूवारी रात्री नागपूरातून प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. यात २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या एहसान खान, कुमार रोहित, अजय चिंकारा यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.