राजू इनामदार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे. मात्र, ऑईल कंपन्यांंबरोबर करार केल्यानंतरही इथेनॉल खरेदीसाठी विलंब लावत असल्याने कारखान्यांची अडचण झाली आहे. कंपन्यांच्या साठवण टाक्या भरलेल्या असल्याने त्यांच्याकडून इथेनॉल खरेदी थांबवली आहे.
केंद्र सरकारने राज्याला १०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे. कारखान्यांनी आतापर्यंत ऑईल कंपन्यांबरोबर १०० कोटी लिटर इथेनॉलचे करार केले आहेत. त्यापैकी ४० ते ४५ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती झाली असून, त्यातील २० कोटी इथेनॉल वेगवेगळ्या ऑईल कंपन्यांनाही पुरवण्यातही आहे. लगेचच पैसे मिळत असल्याने कारखान्यांसाठी इथेनॉलचा पर्याय चांगला ठरत होता.
दरम्यानच्या काळात कोरोनामुळे वाहतुकीवर आलेले निर्बंध, पेट्रोलचा वाढता दर यातून पेट्रोलचा खप नेहमीपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे ऑईल कंपन्यांचा पेट्रोलचा बराच मोठा साठा शिल्लक आहे. त्यामुळे त्यात मिसळण्यात येणारे इथेनॉलही त्यांच्याकडे पडून आहे. इथेनॉलच्या साठवण टाक्या भरलेल्या असल्यामुळे नव्याने येत असलेले इथेनॉल साठवायचे कुठे, यातून त्यांनी कारखान्यांनी पाठवेले टँकर तसेच उभे करून ठेवले आहेत व काही कंपन्यांनी कारखान्यांना सध्या इथेनॉल पाठवू नका, असे कळवले आहे. त्यातून कारखान्यांसमोरही निर्माण केलेल्या इथेनॉलचे करायचे काय, असा प्रश्न उभा राहिला आहे.
पुण्याबरोबरच अहमदनगर, तसेच अन्य काही जिल्ह्यात ही समस्या निर्माण झाली आहे. यातून कारखाने पुन्हा आर्थिक अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. कारण, केंद्र सरकारने कारखान्यांना इथेनाल उत्पादनाचे नवे प्रकल्प तयार करण्यास प्रोत्साहन म्हणून कर्जावरचे ६ टक्के व्याज माफ केले आहे. कर्ज काढून इथेनॉल निर्मिती सुरू केली व आता त्याच्या पुरवठ्यात अशा अडचणी येत असल्यामुळे कारखान्यांची चिंता वाढली आहे.
कोट
पेट्रोलचा खप कमी झाल्यामुळे हा प्रश्न मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये निर्माण झाला आहे. कोरोना स्थिती आटोक्यात आली की घटलेली पेट्रोलची घटलेली मागणी पूर्ववत होईल. साठवण टाक्या रिकाम्या झाल्या की इथेनॉल स्वीकारणे पुन्हा सुरू होईल. यात दोन्ही बाजूंकडून करार झालेले असल्याने फार अडचण येणार नाही.
- शेखर गायकवाड, आयुक्त साखर