लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य सरकारने साखरेच्या रेल्वे वाहतुकीवर अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य सहकारी साखर संघाने राज्य सरकारकडे केली आहे. किलोमागे २ रूपये (क्विंटलमागे २०० रुपये) अनुदानाची संघाला अपेक्षा आहे.
खप कमी व उत्पादन जास्त अशी राज्यातील साखर व्यवसायाची स्थिती असल्याने कारखाने आर्थिक अडचणीत आले आहेत. इथेनॉल निर्मिती करूनही अडचण सुटायला तयार नाही. त्यामुळेच केंद्र सरकार साखर निर्यातीवर देते त्याप्रमाणे राज्य सरकारने साखरेच्या रेल्वे वाहतुकीवर अनुदान द्यावे अशी मागणी होत आहे. तसा लेखी प्रस्ताव साखर संघाने राज्य सरकारकडे दिला आहे.
राज्याची साखरेची गरज ३५ लाख टन आहे. मागील वर्षीची ६३ लाख टन साखर शिल्लक आहे. यंदा इथेनॉलचे उत्पादन वाढवून १० लाख टन साखर कमी केली, तरीही ९९ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन होईल. अशी १६१ लाख टन साखर राज्यात या वर्षी असणार आहे. त्या तुलनेत खप कमी आहे. त्यामुळे उसाची किफायती किंमत (एफआरपी) देणे अवघड झाल्याचे कारखान्यांचे म्हणणे आहे.
केंद्र सरकार सध्या कारखान्यांंना निर्यातीसाठी किलोमागे ६ रूपये (क्विंटलमागे ६०० रूपये) अनुदान देते. त्याचप्रमाणे देशांतर्गत बाजारपेठेत रेल्वेने पाठवल्या जाणाऱ्या साखरेवर राज्य सरकारने वाहतूक अनुदान जाहीर करावे, असा साखर संघाचे म्हणणे आहे. या प्रस्तावावर राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.