पुणे : भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा प्रवेश होईल. खडसे यांच्या प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोध नाही, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. राज्यातील निर्णय केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करूनच होतात. आमच्याकडे टीम वर्क आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने युती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते मागितली. पण निवडून आल्यानंतर आमच्याशी गद्दारी केली. शिवसेनेचा ठाकरे गट आकड्यावर गेला. त्यामुळे आम्ही आकड्यावर गेलाे. त्यांना धडा शिकवला आहे. देवेंद्र फडणवीस सुडाचे राजकारण करत नाहीत, असेही तावडे यांनी सांगितले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सकृत मोकाशी उपस्थित होते. विनोद तावडे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्पात झालेल्या मतदानाची टक्केवारी मागील निवडणुकीप्रमाणेच आहे. मे महिन्यातील ऊन हे एप्रिल महिन्यातच जाणवत आहे. 'आयेगा तो मोदी' असे वातावरण आहे. २० ते ३० टक्के बुथवर विरोधी पक्षाचे कार्यकर्त दिसत नाहीत. काँग्रेसची देशात सत्ता असताना राज्यघटनेत ८० वेळा बदल केला आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी केलेल्या जाहीरातीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा फोटो नाही. या जाहीरातीत केवळ मुद्दे मांडले जावे असा काँग्रेस पक्षाने विचार केलेला दिसतो. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना सून सुनेत्रा पवार बाहेरची वाटत आहे. अमरावतीच्या उमेदवाराबददल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संजय राउत यांनी केलेले वक्तव्य यावरून प्रचार खालच्या स्तरावर गेला आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या बदलल केलेल्या विधानबाबत विचारले असता तावडे म्हणाले, मोदी व्यक्तिगत राजकारण करत नाही. भाजप बेरजेचे राजकारण करत आहे. त्यामुळे मनसेला बरोबर घेतले आहे. भाजपला महिला मतदार आणि प्रथम मतदान करणारे मतदार पसंती देत आहे.
महायुतीला ४० जागा मिळतील -
राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यापैकी महायुतीला ४० जागा मिळतील. आम्ही केवळ मतांसाठी जाहीरनामा काढत नाही. आमच्याकडे व्हिजन आहे, असे विनोद तावडे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही -
दिल्लीत जाऊन बघण्याच्या दृष्टीकोन बदलला आहे. मी महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाही. राष्ट्रातच म्हणजे दिल्लीच राहणार आहे, याचा पुनरूच्चार भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.
पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय-
रायबरेलीमधून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये जे चित्र उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत विनोद तावडे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.