पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कसलाही विरोध नाही. फडणवीस कधीही एकनाथ खडसे यांच्या विरोधात नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना सर्वात जास्त मानाचे आणि हृदयात स्थान पहिल्यापासून दिले आहे. पक्षांमध्ये लोक येत राहतात, मात्र खडसे यांच्याबाबतचा आदर फडणवीस यांच्या मनात कधीच कमी झाला नाही. खडसेंना कुणाचाही विरोध नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
‘हर घर मोदी का परिवार’ या अभियानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आजही त्यांच्या मनातील एकनाथ खडसे साहेबांचा सन्मान कमी झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध कुणाशीही वाईट नाहीत. पक्षप्रवेशाबाबत केंद्रीय आणि राज्य समिती निर्णय घेत असते. त्याबाबत एकनाथ खडसे यांनी येण्याची तयारी दर्शवल्यास या दोन्ही समिती याबाबत विचार करून निर्णय होईल. मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जे-जे कोणी पक्षांमध्ये प्रवेश करू इच्छितात, त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून, बैठक झाल्यानंतर अर्धा तासात जागावाटपाचा अंतिम निर्णय होऊन आपल्यापुढे मांडण्यात येईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ खासदार आले होते. सध्या ते १३ हून अधिक जागा लढत आहेत, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्षदेखील सहा ते सात जागांवर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे भाजपकडून सर्वांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.