लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अंशतः लॉकडाऊन केला तर सरकारने पॅकेज द्याव, अशी मागणी कोरोनाकाळात करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अतिशय बेजबाबदार विरोधी पक्षनेते आहेत, अशी टीका काँग्रेसने केली.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, फडणवीस यांनी जगातील अन्य देशांची उदाहरणे दिली. पण तिथे केंद्राने मदत केली आहे, हे फडणवीस विसरले. भारतात केंद्र सरकारने महाराष्ट्राला काय मदत केली हे त्यांनीच जाहीर करावे. केंद्र सरकार केवळ आकसाने या आपत्ती काळातही महाराष्ट्राची कोंडी करत आहे.
पीएमपी सुरू करावी म्हणून पुण्यात रस्त्यावर आंदोलन करणारे खासदार गिरीश बापट यांच्यावरही तिवारी यांनी टीका केली. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बापट आपले मत मांडू शकत होते, लेखी मागणी करू शकत होते, पण इतक्या पदांवर काम केल्यानंतरही त्यांच्यात जबाबदारीचे भान आलेले दिसत नाही, असे तिवारी म्हणाले.
कोरोना ‘संकट काळात ही राजकारणाची संधी’चा विडा उचलून, ऊठसूठ महाविकास आघाडी सरकारवर तथ्यहीन टीका करणे व हास्यास्पद आरोप करणे आता भाजपाने थांबवावे, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.