पुणे : बाणेर येथे झालेल्या अपघाताचे भीषण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. अपघाताची भीषणता या दृश्याने दिसून आली आहे. वाहतुकीचे पूर्ण नियम पाळून झेब्रा क्रॉसिंगवरील दुभाजकावर उभ्या असलेल्या निष्पाप पादचाऱ्यांना भरधाव मोटारीने उडविले. पुण्यातील रस्ते मोठे झाले असले, तरी ते पादचाऱ्यांसाठी अजूनही सुरक्षित नाहीत, हेच बाणेर येथील घटनेतून पुढे आले आहे़ शहरांमध्ये वाहनांचा वेग एका मर्यादेपेक्षा अधिक वाढू नये, यासाठी अशा सर्व मोठ्या रस्त्यांची पाहणी करून त्याप्रमाणे तातडीने उपाय शोधले पाहिजेत व त्याची अंमलबजावणी गांभीर्याने केली पाहिजे, असे मत पादचारी प्रथमचे प्रशांत इनामदार यांनी व्यक्त केले़ बाणेर येथील अपघाताबाबत ते म्हणाले, ‘‘शहरातील मोठ्या रस्त्यांवरील वाहतूक ही धोकादायक आहे़ सिमेंट-काँक्रीटचे मोठे रस्ते झाले़ त्यामुळे वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे़ बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड येथे वाहनांचा वेग गर्दीमुळे आपोआप नियंत्रित होत असतो़ नागरिक रस्त्यावरूनही जाऊ शकतात़ तेथे असे अपघात होत नाहीत़ जेथे वाहनांचा वेग मर्यादित राहील अशी परिस्थिती नसते, अशा शहरातील रस्त्यांवर वाहनांचा वेग ३० किमीपेक्षा अधिक वाढणार नाही, यासाठी रस्त्याच्या रचनेत व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे़ या अपघातात मोटार अतिशय वेगात होती़ वेगात असेल तरच वाहनांवरील ताबा सुटू शकतो़ त्यामुळे असा अपघात घडू शकेल, अशी ठिकाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी शोधली पाहिजेत़ त्या ठिकाणी वाहनांचा वेग मर्यादित राहील, अशा उपाययोजना करण्याची गरज आहे़गेल्या महिन्यातही झाला होता असा अपघातपुणे : नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करीत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या वाहनाला सुसाट आलेल्या एका मोटारीने जोरात धडक देण्याची घटना गेल्या महिन्यात २९ मार्च रोजी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर घडला होता़ या अपघातात एका महिलेसह वाहतूक शाखेचे तीन कर्मचारी जखमी झाले होते़फर्ग्युसन रस्त्यावर डेक्कन वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदार संध्या काळे या कारवाई करीत होत्या़ त्यांच्यासोबत व्हॅनवरचे कामगार होते. काही जणांच्या दंडाच्या पावत्या दिल्यावर ते वाहनचालक निघून गेले. हे काम सुरू असताना काळे, निखिल भोसले, अनिल नलावडे, प्रवीण कांबळे आणि चौरे नावाच्या महिला टोइंग व्हॅनजवळ उभ्या होत्या. त्या वेळी गुडलक चौकाकडून भरधाव आलेली लाल रंगाची एक मोटार थेट या व्हॅनला येऊन धडकली. काळे पटकन बाजूला सरकल्यामुळे वाचल्या; मात्र भोसले, नलावडे, कांबळे व चौरे यांना धडक बसली. या अपघातात हे चौघेही जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मोटारचालक निकिता बोरा (रा. शिरोळे रस्ता, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. बोरा या प्रचंड वेगात होत्या. त्यामुळे त्यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटले.
वाहतुकीचे नियम पाळूनही निष्पाप पादचाऱ्यांना धोका
By admin | Published: April 18, 2017 3:10 AM