लष्कर : दररोज पटेल रुग्णालयातील नवनवीन गोंधळ समोर येत असून पूर्णपणे कोविड रुग्णालय असूनही येथील हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शनची यादीच जिल्हाधिकारी प्रशासनाकडे पाठविली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन रुग्णांच्या जीवाशी खेळात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगण्यात आले. डॉक्टरांनी दिलेली पावती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. पाच दिवसांपूर्वीच राज्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा, काळाबाजार यामुळे नागरिकांची होणारी तारांबळ लक्षात घेता यावर उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने सर्व कोविड रुग्णालयांना रुग्णांना आवश्यक इंजेक्शनची यादी रोजच्या रोज संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मागवण्याचे आदेश दिले होते. परंतु पटेल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यासंबंधी यादीच जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून दररोज प्रसिद्ध होणाऱ्या यादीत पटेल रुग्णालयाचे नावच नाही.
माहिती देण्यास टाळाटाळ
निवासी मुख्यवैद्यकीय अधिकारी सुटीवर असून याबाबत येथील इतर अधिकारी व कर्मचारी माहिती देत नाहीत. सामाजिक कार्यकर्ते शिरीष अगुरेड्डी म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असून करोनाच्या नावाखाली येथील प्रशासन कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या नातेवाईकाला इंजेक्शन बाहेरून आणण्यास सांगितले होते. परंतु ते कुठेही उपलब्ध नाही. रुग्णालयाला औषध पुरवठा करणाऱ्या रोहिणी मेडिकलकडे विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पुरवठा केला नाही. डॉ. गायकवाड यांना फोन केला असता त्यांनी तो उचलला नाही आणि व्यवस्थापकीय प्रमुखही देखील फोन उचलत नाही.
फोटो-पटेल रुग्णालय