इंदापूर: चालू वर्षी शेतकरी हे कोरोना, त्यानंतर झालेली तीव्र अतिवृष्टीत शेती नुकसानीत जाऊन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांची वीजतोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. शेतकऱ्यांची वीजतोडणी मोहीम हे महाविकास आघाडी सरकार अपयश आहे, अशी टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.
सध्या इंदापूर तालुक्याचे काठावरती पास झालेले राज्यमंत्री हे विकासाच्या पोकळ गप्पा मारत आहेत. मात्र, सध्याच्या वीज तोडणी मोहिमे संदर्भात सध्या एक शब्दही बोलत नाही. कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजतोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
शेतीसाठी वीजपुरवठा महत्त्वाचा असल्याने माझ्या मंत्रिपदाच्या काळात वीज उपकेंद्राची मोठ्या संख्येने निर्मिती केली. तसेच माझ्या काळातील एकदाही शेतकऱ्यांची वीज तोडली नाही. मात्र आताच्या राज्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांवर वीजतोडीचे संकट टाकले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून चारा पिके, भाजीपाला पिके करपून चालली आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे
मी वीस वर्षे मंत्रिपदाच्या काळात काय केले असे विचारणार्या राज्यमंत्र्यांनी त्यांच्या काळात तालुक्यातील एक तरी वीज उपकेंद्र उभे केले का? उलट मी राज्यात सर्वाधिक वीज उपकेंद्रांचे जाळे इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे गेली 25 वर्षात शेतीला पुरेशा दाबाने व नियमितपणे वीजपुरवठा होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
राज्यमंत्र्यांच्या तालुक्यात वाढते अपघात
गेल्या काही दिवसापासून बांधकाम राज्यमंत्र्यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यांच्या कामासंदर्भात ठेकेदारांनी साईड पट्ट्या न भरणे आदी रस्ता सुरक्षिततेच्या संदर्भात योग्य उपाययोजना न केल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याला जबाबदार असणार्यांवर कारवाई करण्याची गरज आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
फोटो :-हर्षवर्धन पाटील