लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या आमदार अशोक पवार यांना आपल्या गावातील पराभव सहन न झाल्यामुळेच आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असा आरोप करत प्रगल्भ लोकशाहीत खालच्या पातळीवर जाऊन केलेली ही कारवाई आहे. याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिला.
वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे बुधवारी (दि.२४) सरपंच उपसरपंच निवडीनंतर जमाबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून गुलाल उधळून मिरवणूक काढल्याप्रकरणी प्रदीप कंद व नवनिर्वाचित सरपंच यांच्यासह नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रदीप कंद बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. धर्मेंद्र खांडरे, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर फराटे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष काका खळदकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक आबासाहेब सोनवणे, भाजप तालुका संपर्क प्रमुख बाबूराव पाचंगे, वडगाव रासाई गावचे नवनिर्वाचित सरपंच सचिन शेलार यासह ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रदीप कंद म्हणाले, वडगाव रासाई हे माझे गाव आहे. आमचे जुने नाव शेलार आहे. भावकीतला मित्र सरपंच झाला. त्यामुळे त्या ठिकाणी गेलो होतो. त्यावेळी ग्रामदैवताच्या दर्शनास जात असताना उत्साही कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढत गुलाल उधळला, अशी मिरवणूक काढू नये याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने तशी नोटीस ग्रामपंचायतीला देणे गरजे होते. परंतु ती दिली नाही. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल झाले. हे केवळ तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना गावातील पराभव सहन न झाल्यामुळेच घडले. भविष्यात असे शंभर गुन्हे दाखल होऊ द्या, शिरूर हवेलीतील सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुखात उपस्थित राहणार, असे प्रदीप कंद म्हणाले.
माजी आमदार बाबूराव पाचर्णे म्हणाले, सरपंच, उपसरपंच निवडीनंतर ग्रामदैवताच्या दर्शनासाठी जात असताना मिरवणूक काढल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद व नवनिर्वाचित सरपंच यांच्यासह ९ जणांवर गुन्हे दाखल केल्याचा तीव्र निषेध करतो. प्रत्यक्षात कोरोनाचे कारण दिले जाते. परंतु तशा पद्धतीचे वर्तन तालुक्याचे लोकप्रतिनिधी स्वतः पाळत नाही. त्यांच्या हळदी कुंकवाचे कार्यक्रमादरम्यान तीन ते साडेतीन हजार महिला एकत्र आल्या. तसेच शिरूर शहरात सायकल रॅलीच्या माध्यमातून शेकडो सायकलस्वार एकत्र आले. त्याचे कोणाला दु:ख वाटत नाही. केवळ प्रदीप कंद वडगाव रासाई गावात सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे अभिनंदन करायला आले म्हणून आकसबुद्धीने हे गुन्हे दाखल करण्यात आहे आहे.