लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लष्करातील पेपरफुटी प्रकरणात खोलवर तपास केल्यानंतर गुन्हे शाखेने लष्कर आणि रेल्वेतील बोगस भरतीचा मोठ्या घोटाळा उघडकीस आणला आहे. यासाठी ‘हेडकॉर्टरल आर्मी’ या नावाने बनावट लष्करी वेबसाइट तयार करून बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचेही उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. हे संपूर्ण देशात रॅकेट पसरले असण्याची शक्यता असून त्यातून १८ जणांची भरती झाल्याचा संशय आहे.
भारत कृष्णा काटे (वय ४१, रा़ मु. पो. राजुरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला अटक केली आहे. राजेंद्र दिनकर संकपाळ (रा. सातारा), दयानंद जाधव आणि बी. के. सिंग (रा. लखनौ) यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. सलमान गौरुउद्दीने शेख (वय २१, रा. मु. पो. करडखेल, लव्हारा, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी फिर्याद दिली.
आरोपींवर गुन्ह्याचा कट रचून बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे तसेच ‘आयटी अॅक्ट’च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतातील विविध ठिकाणी हा प्रकार ऑगस्ट २०२० मध्ये घडला. आरोपींनी आपआपसात संगनमत करून सलमान, शिवाजी जाधव आणि नवनाथ जाधव यांना लष्करात भरती करण्यासाठी ६ लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेमध्ये तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी केली. खरोखरच भरती केली जात असल्याचे भासविण्यासाठी त्यांना वेळोवेळी दिल्ली, झांशी, रांची, लखनौ, जबलपूर येथे बोलावून घेतले गेले. पुण्यातील घोरपडी येथील आर्मी कार्यालयासमोरही आरोपींनी त्यांची भेट घेतली.
आरोपींनी हेडकॉर्टरल आर्मी या नावाने बनावट वेबसाइट तयार करुन चौघांकडून साडेतेरा लाख रुपये घेऊन त्यांना बनावट नियुक्तीपत्रे दिली. याबाबतच लष्कराच्या ‘इंटेलिजन्स’ला माहिती मिळाली. त्यानुसार पुणे पोलिसांनी लष्कराच्या मदतीने सोलापुरातून दोघांना मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यांची चौकशी चालू आहे. लष्कर भरती प्रक्रिया पारदर्शक, निर्दोष आणि ‘झीरो टॉलरन्स’ असण्याबाबत लष्कराचा कटाक्ष असतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये लष्कराकडून पोलिसांना तपासात संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ५ चे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक संतोष तासगावकर, प्रसाद लोणारे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, महेश वाघमारे, प्रवीण काळभोर, दीपक लांडगे, अजय गायकवाड, दत्तात्रय ठोंबरे, अमर ऊगले, प्रमोद टिळेकर, दाऊद सय्यद, विशाल भिलारे, चेतन चव्हाण, संजयकुमार दळवी या पथकाने केली आहे.
चौकट
भारत काटे भरतीपूर्व प्रशिक्षण अॅकॅडमी चालविणारा
भारतीय सैन्य दलाची बनावट वेबसाइट तयार करून त्यामार्फत नोकरीचे आमिष दाखविले जात असल्याची माहिती सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिली. त्यानुसार ‘मिलटरी इंटेलिजन्स युनिट’ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सोलापुरातून काटेला अटक केली आहे. काटे हा भारतीय स्थलसेनेत भरतीपूर्व प्रशिक्षण संदर्भात अकादमी चालवतो. त्याच्याकडे येणाऱ्या तरुणांना तो सैन्यातल्या नोकरीचे आमिष दाखवितो. त्यासाठी ६ लाख रुपये लागतील, असे सांगत़ त्यांच्यात विश्वास निर्माण करून थोडे थोडे करून पैसे घेत होता. दिल्ली, झांशी, रांची, लखनौ, जबलपूर या ठिकाणी उमेदवारांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता पाठवत. ते पास झाल्याबाबत निकाल बनावट वेबसाइटवर जाहीर करून त्यांना बनावट नियुक्तीपत्र दिले जात. त्याचे इतर साथीदार वेगवेगळ्या राज्यांत असल्याने तेथे तपास पथके पाठविण्यात येत आहेत.
चौकट
१८ उमेदवारांची भरती?
आरोपींनी प्रादेशिक सेना भरतीबाबत बनावट वेबसाइट करून त्याची लिंक लष्कर आणि रेल्वेच्या वेबसाइट सोबत जोडली होती. बनावट वेबसाइटवर त्यांनी लष्कराच्या पाच कमांडमध्ये उमेदवार भरती केल्याचे जाहीर करत उमेदवार नावे दिली. यात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात एकूण १८ जण प्रादेशिक भरती झाल्याचे सांगण्यात आले. लष्कर भरतीसाठीच्या उमेदवारांना विमानाने दिल्ली, कोलकाता, जबलपूर या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी लेखी परीक्षा घेऊन तसेच एखाद्या डॉक्टरकडून वैद्यकीय तपासणी करत संबंधित उमेदवार निवड झाल्याचे सांगत. याकरिता उमेदवारांकडून विमान खर्च, लॉजिग, बोर्डिंग खर्च घेतला जाई.