तयार करणारी टोळी उजेडात
२२ जणांवर गुन्हा दाखल : १३ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : न्यायालयात जामिनासाठी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या टोळ्यांचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात एकावेळी छापे घालून पोलिसांनी १३ जणांना अटक केली. तसेच, २२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले गेले आहेत.
शिवाजीनगर, लष्कर, वडगाव यासह वेगवेगळ्या न्यायालयात चोरी, जबरी चोरी, घरफोड्या, दरोडा आणि पॉस्को सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून ते न्यायालयात सादर केले जात. यात आधार कार्ड, रेशन कार्ड आणि सातबारा उतारे बनावट तयार केले जात. ती जामिनासाठी न्यायालयात सादर करून जामीन मिळवून दिला जात असे. जामीन मिळाल्यावर हे आरोपी पोलीस ठाण्यात किंवा न्यायालयात पुढील तारखांना हजर रहात नसत. मात्र, त्याचवेळी त्यांची गुन्हेगारी कृत्ये सुरू राहात.
याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली. त्यानुसार पुण्यात प्रशिक्षणासाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी एकाचवेळी सर्व बाजूने साध्या वेशात वेढा दिला. आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेल्या या आरोपींना ताब्यात घेतले. लष्कर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक प्रदीप साखरे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी नीलेश नंदकुमार शहाणे (वय २७, रा. दत्तवाडी), महारुद मंदरे (वय २६, रा. माणिकबाग), असिफ शेख (वय २७, रा. क़ात्रज), मोहसिन सय्यद (वय ४८, रा. दळवीनगर, निगडी), रशिद सय्यद (वय ४९, रा. शांतीनगर), अमीर मुलाणी (वय ४४, रा. चिंचवड) यांना अटक करण्यात आली असून, रणजित सूर्यवंशी आणि गोपाळ कांगणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट ४ पासून काही अंतरावर एका एजंटला पोलिसांनी पकडले. नागेश माणिक बनसोडे (वय ३९, रा. पिंपरी) याला अटक केली आहे. तसेच भावेश शिंदे (वय ३३, रा. सोलापूर बाजार, वानवडी), विकी पुडगे (वय २८, रा. पिंपळेनगर, सांगवी), कल्पेश इंगोले (वय १८), सोनू अशोक जगधने (वय २९, रा. पुणे रेल्वे स्टेशन), शशांक साळवी (वय ३१, रा. दापोडी), शुभम लांडगे (वय १९, रा. देहुरोड) यांना अटक करण्यात आली आहे.याशिवाय दाविद पहिलवान (वय २७, रा.दापोडी), विशाल गरड (वय ३३, रा.आनंदनगर, चिंचवड), विलास धेंडे (वय ५७, रा.पर्वतीदर्शन) सुरेश डेंगळे (वय २५, रा.चिखली), प्रमोद जगताप (वय ५८, रा.बारामती), प्रवीण ससाणे (वय ४४, रा.बालेवाडी फाटा), मारुती कुदळे (वय ४३, रा.नाना पेठ), रणजित सूर्यवंशी आणि गोपाळ कांगणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
-----------
हजारो गुन्हेगारांना जामीन
याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून या टोळ्या कार्यरत आहेत. ही टोळी सत्र न्यायालयातील जामिनासाठी प्रत्येकी २० हजार रुपये, तर प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील जामिनासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये घेत. या प्रत्येक एजंटने वर्षाला जवळपास ७० ते ८० जणांना जामीन मिळवून दिला आहे. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट आणि विनायक गायकवाड, विक्रम गौड, २७ परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक व १२ अंमलदार यांची विविध पथके तयार करुन शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ च्या बाहेरील रोडवर छापे घालून ३७ जणांना पकडले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्याची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात असून जवळपास हजारो आरोपींना जामीन दिल्याची माहिती मिळालेली आहे. त्यानुसार या गुन्ह्यांचा सखलो तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.