पुणे : कर्जाच्या आमिषाने फसवणूक करण्यासाठी लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या नावे सुरू केलेल्या बनावट काॅल सेंटरचा दत्तवाडी पाेलिसांनी पर्दाफाश केला. पाेलिसांनी दाेघांना अटक करीत ४० माेबाइल तसेच सात टीबी क्षमतेच्या संगणकाच्या हार्ड डिस्क, एक एनव्हीआर आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
दानेश रवींद्र ब्रीद (वय २५, रा. सर्वाेदयनगर, हरिश्री रेसिडेन्सी, फेज १ अंबरनाथ वेस्ट, ठाणे) आणि राेहित संताेष पांडे (वय २४, रा. रूम नं. ११, संगमसदन, किसननगर नं. १, वागळे इस्टेट, ठाणे) अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत.
कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली नागरिकांना काॅल करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दत्तवाडी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेत सहायक पाेलिस आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाडी पाेलिस ठाण्यातील सायबर पथकाने तपास सुरू केला. आराेपींचा माेबाइल क्रमांक, डाेमेन नेम, बॅंक खाते आदीचे तांत्रिक विश्लेषण केले असता हा प्रकार मुलुंड येथून हाेत असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अभय महाजन, पाेलिस निरीक्षक गुन्हे विजय खाेमणे यांच्यासह पथकातील उपनिरीक्षक अक्षय सरवदे, काशिनाथ काेळेकर, जगदीश खेडकर, अनुप पंडित, सूर्या जाधव आणि प्रसार पाेतदार यांनी मुलुंड वेस्टमधील एका काॅल सेंटरवर छापा टाकला. तेथून दाेघांना अटक करीत माेबाइल, संगणक डाटा डिस्कसह इतर साहित्य जप्त केले.
अशी करीत हाेते फसवणूक
या काॅल सेंटरमध्ये ४३ मुले-मुली या सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करीत हाेते. नागरिकांना काॅल करून त्यांचा विश्वास संपादन करीत पन्नास लाखांची पाॅलिसी काढल्यानंतर झीराे टक्के व्याज दराने पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवायचे. त्यानंतर नागरिकांकडून त्याचे आधारकार्ड, कॅन्सल चेक, फाेटाे आणि इतर महत्त्वाच्या गाेष्टी व्हाॅट्सॲपवरून मागवून घेत. कर्जाचे ६ महिन्यांचे हप्ते अडीच लाखांप्रमाणे देतो, असे सांगून त्यापैकी १ लाख २५ हजार रुपये तुम्हाला अगाेदर द्यावे लागतील, असे सांगत रक्कम घेत ते नागरिकांची फसवणूक करीत हाेते.