पुणे : महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या नावाने बोगस कार्ड छापून नागरिकांना त्याचे वितरण केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या कार्डसाठी नागरिकांकडून पैसे वसुल केल्याचे निदर्शनास आले आहे. या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे कार्ड दिले जात नसल्याने अशा बोगस व अनधिकृत कार्डपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. के. शेळके यांनी केले आहे. राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दि. १ जुलै २०१२ पासून राबविली जाते. पूर्वी या योजनेचे नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होते. या योजनेचा लाभ केशरी, पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा शिधापत्रिका धारक कुटुंबियांना मिळतो. योजनेअंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत सुमारे ९७१ प्रकारच्या विविध आजारांमोफत उपचार केले जातात. या योजनेसाठी शासनाकडून लाभार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक कार्ड किंवा ओळखपत्र दिले जात नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ शिधापत्रिका व कोणतेही छायाचित्र असलेले शासनमान्य ओळखपत्र आवश्यक असते. मात्र, जालना व अमरावती जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या नावाने बोगस कार्डचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे. त्यासाठी नागरिकांकडून पैसेही घेतले जात आहेत. या कार्डवर ससून रुग्णालयाचा दूरध्वनी क्रमांकही देण्यात आलेला आहे. याआधारे नागरिकांची आर्थिक पिळवणुक केली जात आहे. त्यामुळे बोगस कार्डबाबत नागरीकांनी सावध रहावे. तसेच अशा खोट्या व फसव्या कार्डाच्या अमिषाला बळी पडू नये. या योजनेच्या अधिक माहितीसाठी १८००२३३२२००/१५५३८८ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. शेळके यांनी केले आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेची बोगस कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 7:25 PM
पुणे : राज्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना दि. १ जुलै २०१२ पासून राबविली जाते.जालना व अमरावती जिल्ह्यांमध्ये या योजनेच्या नावाने बोगस कार्डचे वितरण होत असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्दे या योजनेअंतर्गत रुग्णांना दीड लाख रुपयांपर्यंत सुमारे ९७१ प्रकारच्या विविध आजारांमोफत उपचार केले जातात. योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ शिधापत्रिका व कोणतेही छायाचित्र असलेले शासनमान्य ओळखपत्र आवश्यक असते.