इंदापूर : बनावट डीएनबी प्रमाणपत्र तयार करून त्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांची फसवणूक करणाऱ्या एका वैद्यकीय व्यावसायिकाला मंगळवारी (दि. १०) रात्री इंदापूर पोलिसांनी अटक केली. त्यास १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे.डॉ. सुधीर हरिदास बोरकर (वय ३२, रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी इंदापूर पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध तक्रार दिली आहे.बनावट डीएनबी प्रमाणपत्र तयार करून ते खरे आहे, म्हणून फिर्यादी समक्ष सादर केले. शैक्षणिक अर्हता नसताना ती आहे, असे दाखवून दवाखान्याच्या दर्शनी भागावर लावून तशा आशयाच्या रबरी स्टॅम्पवर वापरून वैद्यकीय व्यवसाय केला. रुग्णांची फसवणूक केली, असा डॉ. बोरकर याच्यावर आरोप आहे. डॉ. सुधीर बोरकर हे एमबीबीएस पदवीधारक आहेत. वैद्यकीय व्यवसाय करण्याचा त्यांचा सात ते आठ वर्षांचा अनुभव आहे. येथील एका खासगी रुग्णालयात ते गेल्या काही महिन्यांपासून प्रॅक्टिसही करत आहेत. मात्र, ते डीएनबी पदवीधर नाहीत, ही बाब अतुलकुमार अंकुश भोसले (रा. शिवपार्वती निवास, कालठण रोड, इंदापूर) या तरुणाने पाठपुरावा केल्याने हा प्रकार उघडकीस आला. डॉ. बोरकर यांच्याकडे उपचार घेत असताना अतुलकुमार भोसले यांचे वडील अंकुश रामचंद्र भोसले (वय ६३, रा. रेडणी, ता. इंदापूर) हे ३० आॅक्टोबर २०१४ रोजी मरण पावले. त्यांच्या मृत्यूला डॉक्टरांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करून भोसले याने त्यांच्या विरुद्ध २१ नोव्हेंबर रोजी इंदापूर पोलिसांकडे तक्रार दिली होती. मात्र, त्या वेळी त्याची दखल घेण्यात आली नाही. २८ नोव्हेंबरला दखल घेण्यात आली. त्यानंतर कागदपत्रे तपासणीच्या हालचाली सुरू झाल्या. डॉ. बोरकर यांनी पोलीस अधिकारी व उपजिल्हा शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांच्याकडे डीएनबी पदवी परीक्षा पास असल्याची कागदपत्रे दिली होती. अतुलकुमार भोसले याने इंटरनेटच्या माध्यमातून माहिती काढल्यानंतर डॉ. बोरकर हे डीएनबीची परीक्षा नापास झाल्याचे स्पष्ट झाले. पोलीस अधिकाऱ्यांना ही अशीच माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर)
बनावट प्रमाणपत्र प्रकरणी इंदापूरमध्ये डॉक्टरला अटक
By admin | Published: February 12, 2015 2:25 AM