लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : शाळा सोडल्याच्या दाखल्यात जन्मतारीख, नोंदणी तारीख तसेच नावात बदल करून बनावट छायांकित प्रतींद्वारे जातीचा दाखला काढणाऱ्या तीन आरोपींना दोन वर्षे साधा कारावास तसेच प्रत्येकी ३ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा बारामती सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. किरण महादेव नरूटे (रा. पिंपळी, ता. बारामती), रहिमतुल्ला ऊर्फ रमजान वजीरभाई इनामदार (रा. देऊळगाव रसाळ, ता. बारामती) व फिरत्या शाळेचा मुख्याध्यापक संदीप जयसिंग मुळीक (रा. माळेगाव, ता. बारामती) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी किरण नरूटे याने वडील महादेव नरूटे यांचा जन्मनोंदी दाखल्यावरील जन्म व नोंदणी तारीख यावर कागद चिकटवून बनावट दाखला तयार केला. तर आरोपी रहिमतुल्ला शेख याने मुलाचा दाखला काढण्यासाठी स्वत:च्या नावावर कागद चिकटवून त्या ठिकाणी रमजान असे नाव लिहून बनावट दाखला तयार केला. हे दोन्ही दाखले बनावट आहेत, हे माहिती असूनदेखील फिरत्या शाळेचा मुख्याध्यापक संदीप मुळीक तहसील कचेरीच्या आवारात बनावट दाखल्यांवर सही व शिक्के दिले. हा प्रकार २ जून २००८ साली घडला होता. तत्कालीन नायब तहसीलदार बंडू जयराम गोरे यांच्या लक्षात आला. गोरे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरिक्षक एस. एस. खंडेकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. फिर्यादी पक्षातर्फे यावेळी सात साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीपुरावे ग्राह्य धरून प्रथम न्यायदंडाधिकारी एक. के. दुगावकर यांनी आरोपींना दोन वर्षे साधा कारावास व प्रत्येकी ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाद्वारे अॅड. फिरोज बागवान यांनी काम पाहिले. बागवान यांना सुभाष काळोखे, निश्चल शितोळे यांनी सहकार्य केले.
बनावट दाखला; तीन आरोपींना साधा कारावास
By admin | Published: May 12, 2017 4:53 AM