पुणे : रात्रीच्या सुमारास नियंत्रण कक्षाचा फोन खणखणतो, राजभवन व यशदा येथे बॉम्ब असल्याचे फोन करणारा सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची चर्चा, तयारी सुरू झाली असतानाच अशा कॉलमुळे सर्व यंत्रणा सतर्क होतात. बॉम्बशोधक व नाशक पथक रात्री संपूर्ण परिसर धुंडाळतात. त्याचवेळी दुसरीकडे फोन करणाऱ्याला पकडण्यात येते. त्याच्याकडे चौकशी केल्यावर आपल्यात दैवी शक्ती असल्याने बॉम्बची माहिती मिळते, असे तो सांगतो. ते ऐकून पोलीस निःश्वास सोडतात. शुक्रवारी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला होता.
नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर पोलिसांनी अतिसुरक्षित राजभवन व यशदाच्या सर्व परिसरात शोध घेतला. पण काहीही मिळाले नाही. फोन करणाऱ्याचा शोध घेतला असता तो शिवाजी रोडवर दगडूशेठ हलवाई गणपती परिसरात असल्याचे आढळून आले. तातडीने पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याचे मानसिक स्वास्थ ठीक नसल्याचे समोर आले.
गेल्या काही दिवसांपासून तो नैराश्यात असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता दैवी शक्ती असल्यामुळे बॉम्बची माहिती मिळते असे उत्तर दिले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत फरासखाना पोलिसांनी जबाब नोंदवून त्याला सोडून दिले.