पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथील एका मृत व्यक्तीच्या नावाने जमिनीचे बनावट कागदपत्र बनवण्याप्रकरणी गावकामगार, तलाठी आणि एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळमालक मृत असतानाही गावकामगार तलाठी यांच्याशी संगनमत करून बनावट प्रतिज्ञापत्र तयार करून घेऊन १ हेक्टर १७ आर क्षेत्राची फसवणूक केली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.दौंड तालुक्यातील पाटस येथील योगेश भीमराव पानसरे, राजेंद्र सुरेश झेंडे, व्ही. एम. भांगे (तलाठी) असे आरोपींची नावे आहेत. या फसवणूकप्रकरणी तेजस रमेश पानसरे (वय २१) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यवत पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध कलम -४२०, ४६८, ४६९, ४७१, आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे आजोबा तुकाराम भागूजी पानसरे हे मृत झालेले असून, त्यांचे नावावर पाटस येथे वडिलार्जित शेतजमीन आहे. गट नंबर १३७ /१० मधील क्षेत्र ५ एकर ३४ गुंठे यांचे रीतसर वारसदार शिवराम तुकाराम पानसरे, अर्जुन तुकाराम पानसरे, रमेश तुकाराम पानसरे आणि यमुनाबाई तुकाराम पानसरे हे आहेत. यातील भीमराव पानसरे यांनी तहसीलदार दौंड यांचेकडे म.ज.म.अ. १९६६ चे कलम ८५ प्रमाणे जमीन वाटप विभाजनासंबंधी केलेल्या अर्जामध्ये योगेश भीमराव पानसरे (रा. पाटस,ता.दौंड) याच्या नावावर १ हेक्टर ६ आर, तर राजेंद्र झेंडे याच्या नावावर ११ गुंठे क्षेत्राची नोंद आहे. (वार्ताहर)
मृताच्या नावे जमिनीचे बनावट कागदपत्र
By admin | Published: November 15, 2016 3:29 AM