खेड शिवापूर: राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत मंगळवारी रात्री आठच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे यांच्या वतीने खेड शिवापुर टोलनाक्यावरती ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार गोव्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये बनावट दारू ही महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असते. या प्रकारची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे होती. हा कंटेनर गोव्यावरून बनावट दारू घेऊन मुंबईच्या दिशेने चालला आहे. अशा प्रकारची माहिती संबंधित विभागाला मिळाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने संबंधित कंटेनरचा पाठलाग केला जात होता. रात्री आठ च्या सुमारास हा कंटेनर खेड शिवापुर टोल नाका पास करून पुढे आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ट्रक तपासासाठी अडवला. त्यामध्ये विविध कंपन्यांची लेबल असलेल्या दारूच्या बाटल्या पोती व बॉक्समध्ये भरलेली आढळून आल्या. कंटेनर मधील मुद्देमालाची किंमत सुमारे 85 लाख रुपये असल्याची माहिती संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सहभाग घेतला होता. शंभूराजे देसाई म्हणाले, महाराष्ट्रात बनावट दारू विक्री अक्षम्य गुन्हा असून अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सदर गुन्ह्यामध्ये खूप मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून त्याचा उलगडा लवकरच होईल. सदर कारवाई केल्याबद्दल कारवाई मध्ये सहभागी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच त्यांनी कौतुक केलं.
खेड शिवापुर टोलनाक्यावर 85 लाखांची बनावट दारू जप्त! शंभूराजे देसाईंच्या उपस्थितीत मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 9:42 PM