नसरापूर : नसरापूर (ता. भोर) येथील बाजारपेठेतील कापड व्यापाऱ्यास लुटल्यास केवळ चार पाच दिवस होत नाही तोपर्यंत दि ६ रोजी पुन्हा वरवे खुर्द येथे तोतया पोलिसाने ज्येष्ठाचे तीन तोळे सोने लुटले आहे. याप्रकरणी दादासाहेब कृष्णराव शिंदे (वय ६५, रा. ऐरोली, नवी मुंबई) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गेल्या ३ जुलै, ३ ऑगस्ट रोजी आणि ६ ऑगस्ट रोजी पोलिस असल्याची बतावणी करत दोन चोरट्यांनी ज्येष्ठांची एकाच प्रकारे फसवणुकीची पद्धत वापरून सोने लंपास करण्याच्या घटना राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत.
दादासाहेब कृष्णराव शिंदे (वय ६५, रा. ऐरोली नवी मुंबई) यांची वरवे खुर्द येथे तीन तोळे वजनाच्या सोन्याची लूट केल्याची घटना घडली. शिंदे त्यांच्या सासऱ्यांच्या वर्षश्राद्धासाठी आले होते. सातारा-पुणे महामार्गाच्या शेजारील सेवा रस्त्यावरून जात असताना हॉटेल नीलकमल समोर मागून येणाऱ्या दुचाकीवरील एका व्यक्तीने आवाज देऊन, ‘मी पोलिस आहे, कितीवेळ तुम्हाला आवाज देतो आहे, तुमचे लक्ष नाही का?, या भागात चेन ओढून चोरण्याचे प्रकार झाले आहेत’ असे सांगितले. त्याचवेळी समोरून एक व्यक्ती आला. त्याच्या गळ्यात सोन्याची चेन होती. त्या व्यक्तीला या तोतया पोलिसाने थांबवून, गळ्यातील सोन्याची साखळी काढ, मी कागदात गुंडाळून तुला परत देतो, असे म्हणाला. यावर त्या व्यक्तीने साखळी देण्यास नकार दिल्यावर त्याने त्याच्या कानाखाली कानफटात मारुन, ‘तुला कळत नाही का? दे ती साखळी, असे म्हणत त्याची साखळी घेऊन कागदात बांधून त्याला खिशात ठेवावयास सांगितली व नंतर मला म्हणाला की, बाबा तुमची साखळी व अंगठी द्या, तुम्हाला कागदात बांधून देतो असे म्हणून, ‘माझी दोन तोळे वजनाची साखळी व एक तोळा वजनाची अंगठी घेऊन कागदात बांधून खिशात ठेवावयास दिली आणि घरी जा असे सांगितले व तो दुचाकीवर दुसऱ्या व्यक्तीला, ‘चल तुला पोलिस ठाण्याला नेतो’ असे सांगून घेऊन गेला.
त्यावर शिंदे यांनी कागद उघडून पाहिले असता कागदात दोन्ही दागिने नव्हते. त्याऐवजी दोन दगड होते. त्यामुळे शिंदे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी दोघांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते भामटे सापडले नाहीत.