लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पॉलीकॅब कंपनीची बनावट इलेक्ट्रिक वायर विक्री करुन हवाला मार्फत पैसे पाठविणाऱ्याला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने अटक केली. दिनेशसिंग रुपसिंग राजपुरोहित (वय ४२, रा. शुक्रवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या वेळी त्याच्या ताब्यातून बनावट इलेक्ट्रिकल वायरचा तब्बल ४३ लाखाचा साठा जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरातील १२ ते १५ इलेक्ट्रिक दुकानदार बनावट व निकृष्ट दर्जाच्या वायरची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बनावट वायर व्यवसायामध्ये अनेक व्यावसायिक सामील असून,त्याचे धागेदोरे परराज्यात पसरलेले आहेत. बाहेरच्या राज्यात राहून बनावट वायर तयार करून राज्यात विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलिसांची पथके बाहेरच्या राज्यात जावून तपास करणार असल्याचे समजते.
जादा आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हव्यासापोटी, दुकानदारांकडून नामांकित ब्रॅण्डच्या नावाने बनावट वायरची विक्री केली जाते. असे वायर इमारीत वापरल्याने शॉर्टसर्किट होऊन इमारतींना आग लागणे, जीवित व मालमत्तेची हानी होणे असे प्रकार शहरात घडले आहेत.
बुधवार पेठेतील तपकीर गल्लीत पवन इलेक्ट्रिकल या दुकानात दिनेशसिंग राजपुराेहित हा पॉलीकॅब या कंपनीच्या नावाने बनावट वायर विक्री करुन फसवणूक करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल, सहायक निरीक्षक संदीप जमदाडे, उपनिरीक्षक जयदिप पाटील, कर्मचारी सचिन ढवळे, प्रविण भालचिम, रमेश राठोड, शितल शिंदे, यांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी दिनेशसिंग हा पॉलीकॅब कंपनीच्या बनावट वायर घेवून आला असता, त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करून गोडाऊनवर छापा टाकत ४३ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याला पुरवठा होणा-या पॉलीकॅब कंपनीच्या बनावट वायर याचे जीएसटी बिल येत नसल्याने,त्या संबधित होणारे सर्व आर्थिक व्यवहार हे हवालाच्या मार्फतीने होत असतात. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस डॉ. शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.
.........
फोटो मेल