पुणे : सध्या राज्यात काेराेनाचा प्रभाव वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यात राज्यातील सर्वाधिक 11 रुग्णांची नाेंद झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. राज्य सरकारकडून या आधीच पुण्यातील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नावाने एक फेक ट्विट व्हायरल हाेत असून त्यात काेराेनाच्या पार्श्वभूमिवर फर्ग्युसन महाविद्यालय बंद ठेवण्याची विनंती फर्ग्युसनच्या प्राचार्यांना माेदींने केल्याचे दाखविण्यात आले आहे.
सध्या पुण्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. दरराेज काेराेनाची लागण झालेल्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहे. त्यातच राज्य सरकारकडून देखील पाऊले उचलण्यात येत असून पुण्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, माॅल्स, जिम, स्विमिंग टॅंक 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असताना आता माेदींच्या नावाने खाेटे ट्विट साेशल मीडियावर व्हायरल हाेत आहे. त्यात 'फर्ग्युसन महाविद्यालय हे भारतातील एक प्रतिष्ठीत महाविद्यालय असून आपण देशाच्या भविष्यावर काेराेनाच्या प्रादुर्भावाची रिस्क घेऊ शकत नाही, त्यामुळे 31 तारखेपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालयाला सुट्टी द्यावी अशी विनंती' अशा आशयाचे ट्विट फर्ग्युसनच्या प्राचार्यांना उद्देशून करण्यात आले आहे.