शिवसेनेचे पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून त्यावरुन झालेल्या मारहाण प्रकरणात माजी खासदार आढळराव सूत्रधार आहेत. त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार दिलीप मोहिते -पाटील यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले, मोहिते यांनी बनाव रचून पोलिसांना हाताशी धरून खोटे नाटक केले आहे. सत्य लवकरच लोकांसमोर येईल. सत्तेत असल्याने पोलीस बळाचा वापर केला. त्याची चौकशी करून मोहिते याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण वरिष्ठांकडे करणार आहे.
सभापती पोखरकर यांना आमच्या दोन सदस्यांनी फोन करून न्यायला बोलावले होते. हॉटेलमध्ये आत प्रवेश नाकारल्याने झटापट झाली. महिला सदस्याबाबतही काहीही घडले नाही. पोलिसांत अशी कोणतीही तक्रार नाही. मोहिते यांनी शिवसेना सदस्यांना आमिष दाखवून अविश्वास ठराव आणला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार सदस्यांनी सह्या केल्या. सगळे स्वतःच्या हॉटेलवर नेऊन ठेवले. ज्या दिवशी ठराव मांडला त्याच दिवशी एका तासात सदस्यांना नोटीस बजावली. याचा अर्थ अधिकारी हाताशी ठेवले.
यावेळी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी वरपे, तालुका प्रमुख रामदास धनवटे, राहुल गोरे, नितीन गोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, माजी उपसभापती राजु जवळेकर, अशोक खांडेभराड, विजया शिंदे, सुरेश चव्हाण, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अमोल पवार, महेश शेवकरी, वैभव गावडे यावेळी उपस्थित होते.