पुणे : ऐन नवरात्रोत्सवात शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसांपासून बंद असल्याने संतप्त झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी वसाहतीबाहेर आणि ज्ञानेश्वर पादुका चौकात रविवारी रास्ता रोको आंदोलन केले. तसेच येथील रहिवाशांनी थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला.
तुर्तास टँकरने पाणी पुरवठा करू आणि पाणी का येत नाही, याबाबत चौकशी करून लवकरात लवकर हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनानंतर संध्याकाळी पाच वाजता वसाहतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. पोलीस लाईन वगळता इतरत्र मात्र पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. मात्र लाईनमध्ये ३ दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय रविवारी सकाळी रस्त्यावर आले़ सकाळी ९ ते साडेदहा दरम्यान महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले आहे. त्यानंतर काही वेळ ज्ञानेश्वर पादुका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. त्यानंतर यंत्रणेला जाग आली. आंदोलन केल्यानंतर काही तासातच सुमारे २० मिनिट वसाहतीमध्ये पाणी पुरवठा करण्यात आला.
दरम्यान सकाळी ९ वाजता सुमारे दीडशे नागरिकांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा नेला़ त्यावेळी नागरिकांनी त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ त्यावर गिरीश बापट यांनी टँकरने पाणी पुरविले जाईल, असे आश्वासन दिले़ त्यानंतर महिला व इतर नागरिक घरी गेले.
शहराच्या अन्य भागात पाणीपुरवठा होतो. मात्र, शिवाजीनगर पोलीस वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा ही बाब नित्याची झाली असल्याची प्रतिक्रिया रहिवाशांकडून करण्यात आली.
कालवा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत : नागरिक हैैराणखडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़ त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत़ शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये पूर्वीपासूनच कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा होत होता. या ठिकाणी दररोज सकाळी ८ ते ९ दरम्यान पाणीपुरवठा केला जातो. मात्र गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी जलकेंद्रातून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचे कारण दिले आहे. वसाहतीत सुमारे १ हजार कुटुंबे असून पाण्यामुळे ते हैराण झाले आहेत.