बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे उद्योजक युगेंद्र पवार यांनी बुधवारी(दि २१) सकाळी ११ वाजता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यालयाला भेट दिली.यावेळी युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड एस.एन.जगताप,अॅड संदीप गुजर,युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे यांनी पवार यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना युगेंद्र पवार यांनी त्यांची राजकीय भुमिका स्पष्ट केली. लोकसभा निवडणुकीत पवार विरुध्द पवार असा संघर्ष पहायला मिळणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आज पक्ष कार्यालय पाहण्यासाठी आलो आहे.निवडणुक अजुन एक महिना आहे. अद्याप उमेदवार ठरलेले नाहित,उमेदवार ठरल्यानंतर बोलु,अशी भुमिका त्यांनी मांडली.
बारामतीच्या मेळाव्यात अजित पवार यांनी आपले कुटुंब एकटे पडले असल्याचे वक्तव्य केले होते. पत्रकारांच्या या प्रश्नावर युगेंद्र पवार म्हणाले, त्यांना एकट पाडल जात आहे, असे मला वाटत नाही. कुटुंब आणि राजकारण वेगळे आहे, हे माझ वैयक्तिक मत आहे. कुटुंबात मी खुप छोटा असल्याचे पवार म्हणाले. राजकारणात ‘ग्राउंड लेवल’ पासुन सुरवात करायला आवडेल.‘पवारसाहेबां’नी सांगितल्यास लोकसभा मतदार संघात दाैरे करणार असल्याचे देखील ते म्हणाले.
अजित पवार यांचे बंधू उद्योजक श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजिव आहेत. ते सक्रीय राजकारणात नाहीत, युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार असून बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. व्यावसायिक जबाबदा-या ते सांभाळतात, मात्र आता ते शरद पवार यांच्या गटात सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात दोन मतप्रवाह तयार झाले. यामध्ये अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या वक्तव्यावर एका प्रकारे त्यांच्या कुटुंबियांकडुन शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जाते.